एसटी नोकर भरतीचा ‘केंद्र घोळ’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

सांगली - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सरळ सेवा परीक्षेत २०१६-१७ च्या उमेदवारांना केंद्र देताना घोळ झाला आहे. पहिल्या तीन पर्यायांमध्ये न निवडलेले आणि मूळ ठिकाणापासून पाचशे ते सहाशे किलोमीटर दूर अंतरावरचे केंद्र काही विद्यार्थ्यांनी देण्यात आले आहे. परीक्षा नियोजनात माझा काही संबंध नाही, मात्र मी सूचना देतो, अशी ग्वाही परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.

तासगाव तालुक्‍यातील एका उमेदवारांनी एसटीचा हा केंद्र घोळ पुढे आणला आहे. ‘सकाळ’ने त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थ्याने लिपिक पदासाठी अर्ज केला आहे. त्यात परीक्षा देण्यासाठी शहर, अशी माहिती भरायची आहे. त्यासाठी तीन पर्याय आहे. या विद्यार्थ्याने पहिला पर्याय सांगली, दुसरा कोल्हापूर आणि तिसरा सातारा भरला आहे. सांगलीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीमध्ये परीक्षा केंद्र आहे, कोल्हापूर जिल्ह्यात घोडावत इन्स्टिट्यूटकडे केंद्र आहे. तरीही या विद्यार्थ्याला नाशिकमधील केंद्र देण्यात आले आहे. सांगली-नाशिक अंतर ४४८ किलोमीटर आहे. किमान दहा तास लागतात. तेथे राहायची सोय, प्रवासाचा खर्च या गोष्टींचे काय, असा सवाल हे विद्यार्थी करत आहेत. 

सांगली, कोल्हापूरला सोय नसती तर गोष्ट वेगळी होती. पर्यायांमध्ये जर स्थळ वेगळेच निवडले असेल तर अन्य ठिकाण का दिले, याचा उलगडाच होत नाही, अशी तक्रार उमेदवारांनी केली.

या प्रश्‍नाची उकल करण्यासाठी उमेदवारांनी १८००२२१२५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. कुणी फोन घेतलाच नाही. त्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना ई-मेल केला आहे. त्यावर प्रतिसादाची ते प्रतीक्षा करताहेत. 

मी सूचना देतो  - रावते
या प्रश्‍नावर ‘सकाळ’ने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘‘भरती प्रक्रियेतील या गोष्टींकडे मी पाहिलेले नाही. मात्र संबंधितांना सूचना दिल्या जातील. काही अडचणी असतील तर त्या सोडवून घ्या, असे मी सांगेन.’’

Web Title: Sangli News ST Jobs recruitment issue