डॉल्बीमुक्तीतून जलयुक्तकडे; युवा शक्तीत परिवर्तनाचा विचार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

सांगली - तरुण पिढी समृद्ध झाली तर देश समृद्ध होईल. या युवा शक्तीचा उपयोग राष्ट्रविकासासाठी होणे गरजेचे आहे. डॉल्बीमुक्तीतून जलयुक्तकडे या उपक्रमातून तरुणाईत परिवर्तनाचा विचार पेरला गेला आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 

सांगली - तरुण पिढी समृद्ध झाली तर देश समृद्ध होईल. या युवा शक्तीचा उपयोग राष्ट्रविकासासाठी होणे गरजेचे आहे. डॉल्बीमुक्तीतून जलयुक्तकडे या उपक्रमातून तरुणाईत परिवर्तनाचा विचार पेरला गेला आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गतवर्षी गणेशोत्सव दरम्यान जातीय सलोखा या योजनेंतर्गत घेतलेल्या विघ्नहर्ता पुरस्काराचे वितरण पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते झाले. भावे नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे उपस्थित होते. 

श्री. देशमुख म्हणाले,""समाजातील शेवटच्या घटकाचा विकास हेच उद्दिष्ट ठेवून पाच वर्षांचा आराखडा करूया. या विचारातून, प्रेरणेतून युवा शक्तीनेही काम करावे. जिल्हा पोलिस दलाने या कामी पुढाकार घेऊन तरुणांना याबाबत दिशा द्यावी. लोकमंगल परिवारच्यावतीने पोलिस दलाच्या बक्षीस रकमेत योगदान देऊ, असे त्यांनी सांगितले. 

राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले,""डॉल्बीमुक्त गणेशोत्सव या उपक्रमातून पोलिस दलाने तरुणाईला चांगल्या गोष्टीसाठी बांधून ठेवले आहे. त्यांना रचनात्मक कार्यामध्ये सहभागी करून घेतले आहे.''  अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. 

ते म्हणाले,""गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्याबाबत केलेल्या आवाहनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील 1369 गणेशोत्सव मंडळांनी हिरीरिने भाग घेतला. जमा झालेल्या जवळपास 28 लाख रुपये रकमेतून सुखकर्ता व विघ्नहर्ता हे बंधारे बांधले.'' 

पोलिस अधिकारी, कर्मचारी, शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.