डल्ला मारणाऱ्यांकडूनच ‘हल्लाबोल’ - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

सांगली - ‘ज्यांनी आतापर्यंत डल्ला मारण्याचा उद्योग केला तेच आता ‘हल्लाबोल’ करत आहेत,’ अशा शब्दांत सहकारमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका केली.

सांगली - ‘ज्यांनी आतापर्यंत डल्ला मारण्याचा उद्योग केला तेच आता ‘हल्लाबोल’ करत आहेत,’ अशा शब्दांत सहकारमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका केली.

भाजप स्थापना दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. देशमुख यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या निवासस्थानी घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘राज्यातील कर्जमाफी योजनेसाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत आता १४ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. तसेच एकरकमी परतफेड (ओटीएस) साठी ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी १४ एप्रिलपर्यंत करावी. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी वरील रक्कम भरली तर त्यांचा सातबारा कोरा होईल. राज्य सरकारने कर्जमाफीसाठी 
पाऊल उचलले आहे. बॅंकांनीदेखील शेतकऱ्यांना सवलत द्यावी. पुढील काळात शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सज्ज राहावे.

शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात कमी पडणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मागील कर्जमाफीचा विचार केला तर ती पाच एकरांच्या आतील होती. त्याची रक्‍कम ३० ते ४० लाखांपर्यंत होती. आता दीड लाखापर्यंत सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात आहे. गरीब, गरजू शेतकरी वंचित राहू नये यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तक्रारीचे निवारण करण्यासाठी तालुका पातळीवर सहायक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यांनी तत्काळ प्रस्ताव पाठवावेत, अशा सूचना दिल्या आहेत.’’

श्री. देशमुख म्हणाले, ‘‘ज्यांनी आतापर्यंत डल्ला मारला ते आता हल्लाबोल करत आहेत. भाजपविरुद्ध सर्वजण एकत्र आल्यामुळे विरोधक कमकुवत झाल्याचे दिसत आहेत. स्वतंत्रपणे ते मुकाबला करू शकत नाहीत म्हणून एकत्र आले आहेत. परंतु राज्यातील जनता हुशार आहे. भाजप चांगले काम करत असल्याचे त्यांना माहीत आहे. अनेक योजनांचा लाभार्थींना थेट लाभ देऊन मधले दलाल कमी केले आहेत. आजपर्यंत मूठभर लोकांनाच केंद्र व राज्याच्या योजनांचा फायदा होत होता.

जनतेसाठी एक रुपया दिला तर १५ पैसेच खालीपर्यंत पोचायचे. ८५ पैसे खाणारे म्हणजेच डल्ला मारणारे आता आंदोलन करत असल्याचे जनतेला कळाले आहे. भाजप आयात उमेदवारांवर निवडणूक लढवते, असा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीचा ढोंगीपणा सर्वांनाच माहीत आहे. निवडून आलेला तो आपला आणि पराभव झालेला दुसऱ्यांचा अशी त्यांची नीती आहे.’’

विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न
श्री. देशमुख म्हणाले, ‘मंत्रालयातील उंदरांवर आणि चहापानाच्या खर्चावरील टीका केविलवाणी म्हणावी वाटते. उंदरांवरील खर्चाबाबत चंद्रकांतदादा पाटील यांनी माहिती दिली आहे. चहाबाबतीत म्हणायचे तर पाहुण्याला चहा देणे, ही आपली संस्कृती आहे. संस्कृती जपणे आपले काम आहे. विरोधी पक्षानेही चहा, जेवण आणि नाष्टा घेतला आहे; परंतु या थराला जाऊन होणारी टीका म्हणजे संस्कृती नाही.’

Web Title: Sangli News Subhash Deshmukh comment