फ्लॅट फोडून २५ लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

सांगली - शंभरफुटी रस्त्यावरील चेतना पेट्रोल पंपासमोरील गोकुळधाम अपार्टमेंटमधील फ्लॅट भरदिवसा फोडून चोरट्याने १५ लाख रोकड, ३१ तोळे सोन्याचे दागिने असा २५ लाखांचा ऐवज लंपास केला. अमोल नानासाहेब पाटील (वय ५६) यांनी या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सांगली - शंभरफुटी रस्त्यावरील चेतना पेट्रोल पंपासमोरील गोकुळधाम अपार्टमेंटमधील फ्लॅट भरदिवसा फोडून चोरट्याने १५ लाख रोकड, ३१ तोळे सोन्याचे दागिने असा २५ लाखांचा ऐवज लंपास केला. अमोल नानासाहेब पाटील (वय ५६) यांनी या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः श्री. पाटील गोकुळधाम अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट नंबर १९ मध्ये पत्नी आणि मुलीसह राहतात. आष्टा (ता. वाळवा) येथे त्यांची शेती आहे. ते काल (ता. ३०) सकाळी दहा वाजता आष्टा येथे शेताकडे गेले होते. फ्लॅटमध्ये पत्नी आणि मुलगी होती. दुपारी दीडच्या सुमारास पत्नी आणि मुलगी बाजारात खरेदीसाठी बाहेर पडल्या. त्यामुळे फ्लॅटमध्ये कोणीच नव्हते. चोरट्याने याच वेळी  नेमका बंद फ्लॅट हेरला.

श्री. पाटील यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये आल्यानंतर सर्वत्र शोध घेऊन बेडरूममधील कपाट उघडले. कपाटात ठेवलेले रोख १५ लाख रुपये घेतले. त्यानंतर ८४ ग्रॅमचा बाजूबंद, ३० ग्रॅमचा नेकलेस, १०० ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट, २० ग्रॅमचे वेढण, १५ ग्रॅमची सोनसाखळी, १० ग्रॅमचा नेकलेस, ३० ग्रॅमचे सोन्याचे छोटे दागिने आणि दहा हजाराच्या चांदीच्या वस्तू असा २५ लाखांचा ऐवज  घेऊन चोरट्याने पलायन केले.

दुपारी साडेतीनच्या सुमारास श्री. पाटील यांची पत्नी  आणि मुलगी फ्लॅटकडे परतली; तेव्हा कुलूप तोडल्याचे पाहून धक्काच बसला. 

आतमध्ये आल्यानंतर चोरट्याने रोकड, सोन्याचे दागिने लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ श्री. पाटील यांना हा प्रकार कळवला. त्यानंतर सायंकाळी श्री. पाटील फ्लॅटकडे परतले. विश्रामबाग पोलिसांना हा प्रकार कळवला. रात्री पोलिसांनी फ्लॅटकडे धाव घेऊन पंचनामा केला. श्‍वान पथकाला पाचारण केले; परंतु ते परिसरातच घुटमळले. त्यामुळे चोरट्याचा ठावठिकाणा समजू शकला नाही. सहायक पोलिस निरीक्षक संगीता माने तपास करत आहेत.

१५ लाखांची रोकड
श्री. पाटील यांनी फ्लॅट खरेदी आणि शेतीची खते, औषधासाठी १५ लाख रुपये आणून फ्लॅटमध्ये ठेवले होते. चोरट्याने फ्लॅट फोडल्यानंतर कपाटातील ड्रॉवरमधील रोकड त्याच्या हाती लागली. एवढी मोठी रोकड चोरट्यांच्या हाती लागल्याबद्दल परिसरात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. अपार्टमेंटमध्ये एकूण चार मजले असून २४ फ्लॅट आहेत. चोरट्याने श्री. पाटील यांचा बंद असलेलाच फ्लॅट फोडून डल्ला मारला.

Web Title: sangli news theft Robbery