‘ट्रॅफिक’ नियंत्रण नव्हे, ‘टोल नाका’च

बलराज पवार, अजित झळके, घनशाम नवाथे
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

सांगली - रस्त्यांवर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या धडकेत किड्यामुंगीसारखे लोक मरत आहेत. अशावेळी वाहतूक नियंत्रणासाठी हाती दंडुका घेऊन रस्त्यावर उतरायचे सोडून सांगली, मिरज शहरांतील वाहतूक नियंत्रण पोलिस टोलनाका वसुली कर्मचाऱ्याच्या भूमिकेत वावरत आहेत. वाहतुकीला शिस्त लावण्यापेक्षा परवाना नसलेल्यांना टिपून पावती फाडण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महसूल वसुलीचे आकडे वाढवून यांना ‘मेडल’ मिळेल; मात्र लोकांचे जीव जाताहेत, त्याचे काय? 

सांगली - रस्त्यांवर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या धडकेत किड्यामुंगीसारखे लोक मरत आहेत. अशावेळी वाहतूक नियंत्रणासाठी हाती दंडुका घेऊन रस्त्यावर उतरायचे सोडून सांगली, मिरज शहरांतील वाहतूक नियंत्रण पोलिस टोलनाका वसुली कर्मचाऱ्याच्या भूमिकेत वावरत आहेत. वाहतुकीला शिस्त लावण्यापेक्षा परवाना नसलेल्यांना टिपून पावती फाडण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महसूल वसुलीचे आकडे वाढवून यांना ‘मेडल’ मिळेल; मात्र लोकांचे जीव जाताहेत, त्याचे काय? 

वाहतूक नियंत्रण विभागाच्या सध्याच्या 
हालचाली ‘काम कमी, वसुली जास्त’ अशाच दिसत आहेत. पुष्पराज चौक, मिरजेतील कृपामई रुग्णालय या दोन ठिकाणी वाहनांची कसून चौकशी केली जाते. वरकरणी हा उपक्रम स्तुत्य वाटतो; मात्र इथे वाहन तपासणीपेक्षा ‘बकरा शोध’मोहीम होत असल्याचे ‘सकाळ’ने टिपले आहे. चारचाकी वाहने थांबवून त्याची झडती घेतलीय, असे अपवादानेच होते. दुचाकीवर भांबावलेला चेहरा दिसला की फाडा पावती, आडोशाला उभे राहून एकेरी मार्गात कुणी दिसला की फाडा पावती, असले प्रकार करण्यात धन्यता मानली जात आहे. मिरज शहराबाहेर सुभाषनगर फाटा हा नवा वसुली अड्डा बहरला आहे. पुष्पराज चौकात तर एकावेळी १० ते १२ कर्मचाऱ्यांची फौज तैनात असते. शहरातील वाहतूक वाऱ्यावर अन्‌ सारी यंत्रणा नाक्‍यावर, अशीच त्या वेळी स्थिती असते. 

अजून किती बळी?
या साऱ्यात भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याच्या घटना वाढताहेत. येथे शंभर फुटी रस्त्यावर बुधवारी दुपारी एका डंपरचालकाने चालत निघालेल्या पेंटरला धडक दिली. त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आदल्या रात्री कोल्हापूर रोडवर एका भरधाव चारचाकीने तीन दुचाकी आणि एका चारचाकीला धडक दिली. यामध्ये पाचजण जखमी झाले. ही गाडी आशीर्वाद ढाब्यात घुसता घुसता वाचली. गाडी फरफटत जाऊन उलटली, चालक बचावला. बुधवारी रात्री मिरज रस्त्यावर वॉन्लेसवाडीजवळ भरधाव दुचाकीने धडक दिल्याने द ग्रेट रशियन सर्कसमधील महिला ठार झाली, तर तिचा मुलगा जखमी झाला आहे. 

अपघात ठिकाणे
पुष्पराज चौकात तर सहा रस्ते येतात. भरधाव वेगाने गाड्या धावतात. त्यांच्यावर कारवाई होतच नाही. या चौकात गेल्या वर्षभरात दोन भीषण अपघात झाले. चौघांचा बळी गेला. येथे अपघात ठिकाण म्हणून फलक नाही. चिंतामण नगरचा पूल, १०० फुटी चौक, कुपवाडचा चौक, साखर कारखाना चौक, बायपास रोडवरील माधवनगरला जाणारा चौक, आयर्विन पुलाजवळचा चौक, कोल्हापूर रोडवर आकाशवाणी  आणि अंकली फाटा ही अपघात स्थळे आहेत. तेथे वाहतूक नियंत्रण विभागाने उपाययोजना व सक्तीची  मोहीम राबवण्याची आवश्‍यकता आहे. 

दीडशेवर बळी
एका युद्धात मरत नाहीत एवढी माणसं तीन वर्षांत सांगली परिसरातील रस्त्यांवर ठार झाली आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड परिसरात गेल्या काही वर्षांत वाहनांच्या वेगाचा थरार वाढला आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे,  नशेत वाहन चालवणे आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष यामुळे अपघात वाढतच चालले आहेत. गेल्या पावणेतीन वर्षांत तिन्ही शहरांत दीडशेहून अधिक  जणांचा अपघाती बळी गेला आहे. २०१४ पासून ही आकडेवाडी प्रत्येक वर्षात वाढतच आहे. वाहनांची  संख्या वाढत असताना अपघातांचे प्रमाणही दुसरीकडे वाढतच चालले आहे. ही बाब चिंताजनक आहे.

‘स्पीड गन’चा शो
वेगाचा थरार रोखण्यासाठी सांगली वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात दोन वर्षांपूर्वी ‘स्पीड गन’ आली. वेगवान आणि बेदरकार वाहनांवर स्पीड गन रोखून कारवाईसाठी पोलिसांना प्रशिक्षण दिले. वर्षापूर्वी कारवाई सुरू केली. आता ती गन आहे कुठे? 

६ रस्त्यांवर ताशी ५० कि.मी. वेग
सांगली आणि मिरजेतील सहा रस्त्यांवर वेगमर्यादा ताशी ५० कि.मी. केली आहे. त्यामध्ये राममंदिर चौक सांगली ते महात्मा गांधी चौक मिरज, कर्मवीर भाऊराव पुतळा ते काळीखण - आपटा पोलिस चौकी - कॉलेज कॉर्नर, कॉलेज कॉर्नर ते माधवनगर, कोल्हापूर रस्ता टी-जंक्‍शन ते वालचंद अभियांत्रिकीपर्यंतचा शंभरफुटी रस्ता, सांगलीवाडी टोलनाका - शिवशंभो चौक - माधवनगर रस्ता टी पॉईंट, मिरजेतील बालाजी मंगल कार्यालय - मिरज सिव्हिल - गांधी चौक - बस स्थानक ते महात्मा फुले चौक हे रस्ते आहेत. परंतु, वेगमर्यादा सर्रास ओलांडली जाते.

‘ती’ सर्कस बरी होती
विजयनगर येथे दि ग्रेट रशियन सर्कसमध्ये एकचाकी सायकल चालवणाऱ्या प्रमिला नकुल पानी या महिलेला रस्त्यावर चालताना भरधाव वाहनाने चिरडले. ती ठार झाली. तिचा मुलगा गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार घेतोय. तिने आयुष्यभर सर्कसमध्ये कसरती केल्या; मात्र सांगलीच्या रस्त्यावरील सर्कस तिच्यासाठी जीवघेणी ठरली. किती माणसं मरण्याची वाट पाहणार आहेत अजून? यंत्रणेच्या संवेदना बोथट झाल्याने माणसाच्या जीवाचे मोल राहिलेले नाही, असेच म्हणावे लागेल.  

वाढत्या अपघातांवर नियंत्रण ठेवणारी रस्ता सुरक्षा समितीच सध्या कोमात आहे. केवळ सप्ताह साजरा करण्यापुरतेच काम राहिले आहे. शहरातील वाहतुकीचा ठोस आराखडा तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी सुधार समितीने पुढाकारही घेतला आहे. मात्र, सुरक्षा समितीने त्याला मंजुरी देऊन तातडीने त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तरच वाढत्या अपघातांवर नियंत्रण येईल. त्याचबरोबर आरटीओ, वाहतूक शाखा आणि महापालिका प्रशासनाने या प्रश्‍नावर एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.
- ॲड. अमित शिंदे, कार्याध्यक्ष, जिल्हा सुधार समिती. 

लोणी बाजारात कायमस्वरूपी रस्त्यावर बसण्यास मनाई आदेश झाला आहे. आदेशाची अवमान याचिका मिरजेच्या न्यायालयात दाखल आहेच. आणखी एक प्रकरण सुनावणीसाठी न्यायालयात दाखल आहे. पोलिसांनाही नागरिकांनी प्रतिवादी केले आहे. महापालिकेचे अधिकारी यापूर्वी अडचणीत आले आहेत. तेव्हा पोलिसांना जाग येणार काय?
- तुषार देशपांडे, मिरज

महापालिका क्षेत्रातील अपघात
वर्ष    अपघात    जखमी    मृत
२०१४      ९५       ९९        ३६
२०१५    १०५       ८१        ४७
२०१६    १३१      १००      ५५

 

Web Title: sangli news traffic problems