वसंत अंगणी फुलला...!

प्रा. अशोक घारपुरे
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

दादा आले. स्थानापन्न झाले. शिवप्रतिमेस त्यांनी फुले वाहिली. दोन मिनिटे ते स्तब्धपणे डोळे मिटून उभे राहिले. शिवप्रतिमेसमोर त्यांनी काय मागितले असावे? ‘‘शिवोभूत्वा शिवं यजेत्‌’’ असेच काहीसे त्यांनी मनात ठरवले असणार. उपस्थितांमधील अनेक परिचित स्नेह्यांशी दादांनी गप्पा मारल्या. जाताना सर्वांचा निरोप घेत बाहेर पडले; मात्र सारे वातावरण वसंतमय करून गेले. आमच्या वाड्याच्या अंगणी वसंत फुलल्याचा तो आनंद आजही माझ्या स्मरणकुपीत साठवून ठेवला आहे.

साधारण ६०-६१ साल असावे. विधानसभा निवडणुकीसाठी जनसंघातर्फे माधवराव तथा अण्णा गोडबोले लढत होते. त्या वेळी आमचा पराभव निश्‍चित होता. अण्णांचा पोलिंग एजंट म्हणून मी काम करीत होतो. सिटी हायस्कूलच्या केंद्रावर नेमणूक होती. सकाळी दहाच्या सुमारास दस्तुरखुद्द वसंतदादा आले. सोबत त्यांचे निवडक कार्यकर्ते होते. त्यांच्या शर्टवर तिरंगी फीत होती. काँग्रेसच्या तिरंगी ध्वजाशी साधर्म्य सांगणारी ही खूण मला खटकली. मी मनाचा हिय्या करून दादांसमोर जात हरकत घेतली.

केंद्रप्रमुख अधिकारी तत्काळ पुढे धावले. दादांचे मोठे नाव होते. त्यामुळे माझ्या हरकतीचे काय होणार हेही मला माहीत होते. हरकत फेटाळली; मात्र दादा पुढे होत माझ्या खांद्यावर हात टाकत म्हणाले, ‘‘बाळ असं नसतं.’’ ती दादांची, माझी पहिली भेट. खडाखडीची. घरातल्या लोकांना माझे हे वागणे खटकले. त्यांनी पुन्हा असा उद्योग करू नको, असा सल्ला दिला. 

माझ्या पुढच्या सामाजिक जीवनात मला वसंतदादांचा अनेकवार सहवास लाभला. बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्रावरील व्याख्यानांना त्या वेळी सरकारने करमणूक कर लावला होता. आम्ही व्याख्यानमालेतील काही सदस्य दादांना व्याख्याने करमुक्त करावीत यासाठी भेटलो. दादांनी लक्षपूर्वक आमचे म्हणणे ऐकले आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी भेटून बघतो, असे म्हणाले. दादांनी केवळ अाश्‍वासनच दिले नाही.

व्याख्यानमाला करमुक्त झाली. त्यानंतर बाबासाहेब आणि दादांचे संबंध जवळकीचे झाले. सांगलीत मोठे कार्य निघाले की, सांगलीकर आधी गणेशाला आणि नंतर दादांना भेटायचे. वालचंद महाविद्यालयाचा रौप्यमहोत्सव, ग्रंथालय अधिवेशन अशा अनेक कार्यक्रमांत ते आमच्या पाठीशी उभे राहिले. वालचंद महाविद्यालयासाठी त्यांच्यामुळेच ७५ टक्के अनुदान मिळाले. अशा अनेक संस्थांच्या पाठीशी ते असत.  

दादा माझ्या घरी यावेत, अशी खूप इच्छा होती. ते आमच्या वाड्यावर येतील का, असे वाटायचे. एक चांगला मुहूर्त मिळाला. १९७४ मध्ये शिवराज्याभिषेकाची त्रिशताब्दी सर्वत्र साजरी होत होती. या निमित्ताने मी वाड्यावर पानसुपारीचा कार्यक्रम ठेवला. शिवप्रतिमेचे पूजन करावे आणि सर्व स्नेहीजनांना निमंत्रित करावे, असे ठरले. शिवकालीन भाषेतील निमंत्रण पत्रिका घेऊन मी दादांना भेटायला गेलो. प्रचंड गर्दीतही त्यांनी माझी पत्रिका लक्षपूर्वक वाचली आणि येण्याचा शब्द दिला.

दादा येणार हे मी घरी येऊन सर्वांना सांगितले; मात्र सारे साशंक होते. तो दिवस उजाडला. सायंकाळी लोक जमू लागले. सनईच्या सुरांनी वातावरण मंगलमय झाले होते. सारे गप्पागोष्टीत रमले होते. माझे लक्ष मात्र दादांच्या आगमनाकडे लागले होते. सातच्या सुमारास दादांच्या मोटारीचा ताफा आमच्या दारात अवतरला. मी धावतच बाहेर गेलो. पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दादा आले. स्थानापन्न झाले. शिवप्रतिमेस त्यांनी फुले वाहिली. दोन मिनिटे ते स्तब्धपणे डोळे मिटून उभे राहिले. शिवप्रतिमेसमोर त्यांनी काय मागितले असावे? ‘‘शिवोभूत्वा शिवं यजेत्‌’’ असेच काहीसे त्यांनी मनात ठरवले असणार. उपस्थितांमधील अनेक परिचित स्नेह्यांशी दादांनी गप्पा मारल्या. जाताना सर्वांचा निरोप घेत बाहेर पडले; मात्र सारे वातावरण वसंतमय करून गेले. आमच्या वाड्याच्या अंगणी वसंत फुलल्याचा तो आनंद आजही माझ्या स्मरणकुपीत साठवून ठेवला आहे.