'ते' जंतनाशक जागतिक आरोग्य संघटनेचे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

आयात गोळ्या - नमुने मुंबई प्रयोगशाळेला रवाना; आता "नागपूर मेड'चा वापर

आयात गोळ्या - नमुने मुंबई प्रयोगशाळेला रवाना; आता "नागपूर मेड'चा वापर
सांगली - ढवळेश्‍वर (विटा) येथील अंगणवाडीतील बालकांना जंतनाशकातून बाधा झाल्याचे प्रकरण आता थेट जागतिक आरोग्य संघटने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन- डब्ल्यूएचओ)शी जोडले गेले आहे. या जंतनाशकाच्या अल्बेनडझोल गोळ्या भारतात आयात करण्यात आलेल्या असून, त्या "गॅलेक्‍सो स्मिथ क्‍लीन' या कंपनीने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसाठी निर्माण केलेल्या आहेत. त्याचे नमुने प्रयोगशाळा परीक्षणासाठी आज मुंबईतील ड्रग कंट्रोल लॅबकडे पाठवण्यात आले. येत्या चार दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त होईल, अशी अपेक्षा औषध नियंत्रण विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी निगडित या प्रकरणाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा हालली आहे. ढवळेश्‍वर (ता. खानापूर) येथील अंगणवाडीतील 32 बालकांना जंतनाशक गोळ्यांची बाधा झाली होती. या मुलांना सकाळी उपाशीपोटी गोळ्या दिल्या होत्या. त्यानंतर त्यांना उलट्या सुरू झाल्या. 24 मुलांवर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. आठ बालकांची स्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्याने त्यांना सांगलीत जिल्हा रुग्णालयात हलविले होते. जंतनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर लगेचच मुलांना उलट्या, पोटात दुखणे, गुंगी येणे असा त्रास सुरू झाला होता.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत 1 ते 19 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत जंतनाशक औषध वाटप केले जात आहे. ढवळेश्‍वर प्रकरणानंतर त्याकडे संशयाच्या नजरेने पाहायला सुरवात झाली, कारण जिल्हा आरोग्याधिकारी राम हंकारे यांनी औषधाचे नाव सांगण्यास नकार दिला होता. "सकाळ'ने या औषधाचे नाव आणि त्याची सविस्तर माहिती मिळवली असून, हे प्रकरण थेट जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित असल्याने त्याचे गांभीर्य वाढणार आहे. जिल्हा परिषदेकडे शासनाने आयात केलेल्या जंतनाशकाच्या गोळ्यांचा साठा आला आहे. या गोळ्यांची निर्मिती नेमकी कोणत्या देशात झाली आहे, याचा उल्लेख या गोळ्यांच्या डबीवर करण्यात आलेला नाही. त्याची सक्ती नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आता या गोळ्यांमध्ये काही दोष होता की उपाशी पोटी त्या दिल्या गेल्याने मुलांना त्रास झाला, याचा उलगडा अहवाल प्राप्तीनंतर होईल.

साठा परत मागवला
जागतिक आरोग्य संघटनेकडून आलेल्या या संशयास्पद गोळ्यांचा जिल्ह्यातील साठा जिल्हा परिषदेने त्या-त्या अंगणवाडी व शाळांकडून पारत मागवला आहे. या गोळ्या वापरू नयेत, अशा स्पष्ट सूचना आहेत. त्याऐवजी नागपूर येथे उत्पादित झालेल्या गोळ्यांचा नवा साठा पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गोळ्यांची मुदत संपलेली नाही
डॉ. राम हंकारे यांनी गोळ्यांची माहिती लपवल्याने त्या कालबाह्य होत्या का ? असे प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. वास्तविक, या गोळ्यांचा वापर सन 2021 पर्यंत केला जाऊ शकतो, अशी माहिती हाती आली आहे. त्या गोळ्या सन 2016 ला उत्पादित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एका शंकेचे निरसन झाले आहे, आता प्रत्यक्ष अहलावाची प्रतीक्षा असेल.