सांगली जिल्हा परिषदेवर फुलले भाजपचे कमळ

सांगली जिल्हा परिषदेवर फुलले भाजपचे कमळ

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा धुव्वाः खानापूरमध्ये सेनेचा भगवा; भाजपकडे पाच पंचायतीत सत्ता

सांगलीः सांगली जिल्हा परिषदेत शुन्यावरून थेट सत्तेपर्यंत मजल मारत भाजपने "झिरो टू हिरो' असा इतिहास घडवला. 4 आमदार आणि एक खासदार असे विधानसभा आणि लोकसभेला यश मिळवणाऱ्या भाजपचा विजयाचा अश्‍वमेध दौडतच आहे. तो रोखण्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला पुरती अपयशी ठरली.

गेल्या विधानसभेपासून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या तालुक्‍या तालुक्‍यांच्या शिलेदारांनी भाजपच्या यशाचा गोवर्धन उचलून धरला. ही यशाची कमान सुरु करणाऱ्या खासदार संजय पाटील यांना त्यांचे होमग्राऊंड तासगावमध्ये तसेच आमदार शिवाजीराव नाईक यांना शिराळ्यात हार पत्करावी लागली. भाजपच्या धवल यशाला अपयशाची ही किनार जाणवणारी होती. हातघाईच्या या लढाईतही राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांमध्ये थेट किंवा आघाडीच्या आधारे सत्ता प्राप्त केली आहे.

भाजपने पलूस, कडेगाव, आटपाडी,जत, मिरज या पाच पंचायत समितीत भाजपने पुर्ण सत्ताही प्राप्त केली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक फटका कॉंग्रेसला बसला. पक्षाचे राज्यस्तरावर नेतृत्व करणाऱ्या पतंगराव कदम यांना त्यांच्या पलूस कडेगावच्या बालेकिल्यात हार पत्करावी लागली. राष्ट्रवादीने 14 जागांसह जिल्हापरिषदेत दुसरे स्थान राखले. भाजपला चिन्हावर 25 तर रयत आघाडीसह 29 जागांवर यश मिळाले आहे. त्यांना बहुमतासाठी फक्त 2 जागांची गरज आहे. ती ती गरज शिवसेना, कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीतील त्यांच्या आघाडी सदस्यांसोबत पुर्ण करू शकतात. सध्या भाजपमध्ये असलेले पण स्वतंत्रपणे लढलेले अजितराव घोरपडेही बहुमताची गरज पुर्ण करु शकतात. त्यामुळे बहुमत सिध्द करणे ही भाजपसाठी मोठी बाब उरलेली नाही.ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने खिंडार पडल्यानंतर राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी वाऱ्याची दिशा ओळखून कॉंग्रेसकडे आघाडीसाठी हात पुढे केला. मात्र ती त्यांची हतबलता समजून कॉंग्रेस नेत्यांनी त्यांना झिडकारले. मात्र तरीही त्यांनी वाळवा,तासगावचे गड राखताना कवठेमहांकाळ, शिराळा येथे आघाडी करून त्यांनी राष्ट्रवादीची वाताहत रोखण्याचा अटोकाट प्रयत्न केला. त्यांना खुद्द होमग्राऊंडव वाळव्यात घेरण्याचा प्रयत्न त्यांच्या पारंपरिक विरोधकांनी एकत्र आघाडी करुन केला. तरीही त्यांनी वाळव्यात गतवेळेपेक्षा एकाच जागेवर शिकस्त खावी लागली. मात्र पंचायत समितीत त्यांनी निर्विवाद सत्ता राखली आहे.

23 जागांचे विरोधी पक्षाचे बळ असणाऱ्या कॉंग्रेसचा घसरण 10 जागावर झाली आहे. मिरज, पलुस, कडेगाव येथील मोठ्या घसरणीमुळे त्यांचे सर्वात मोठे नुकसान त्यांचेच झाले आहे. या तालुक्‍यांवरील कॉंग्रेसचा झेंडा प्रथमच खाली आला आहे. तेथे भाजपचे कमळ फुलले आहे. विशेषतः मिरज पंचायत समितीत स्वातंत्र्यानंतर प्रथमच कॉंग्रेस हद्दपार झाली आहे.

शिवसेनेने विक्रमी कामगिरी करीत आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखाली खानापूर पंचायत समितीव भगवा फडकवला आहे. त्यांनी जिल्हा परिषदेला तीन तर पंचायत समितीत 5 जागा मिळवून प्रथमच सेनेचा भगवा फडकवला. आमदार बाबर यांनी शिवसेनेला सांगली जिल्ह्यात प्रथमच एवढे यश मिळवून दिले आहे. वसंतदादांच्या जिल्ह्यात कॉंग्रेसचे पुरते पानिपत करण्याचा जणू विडाच सांगलीच्या वसंतदादा घराण्याने उचलला होता. जागोजागी बंडखोरांना उत्तेजन देत त्यांनी मिरज आणि जत मधील कॉंग्रेसच्या अपयशात मोठा वाचा उचलला. आमदार विलासराव जगताप यांच्याविरोधात कॉंग्रेस आणि वसंतदादा आघाडी अशी लढत झाली. सुरेश शिंदे यांची दादा आघाडीला फक्त पंचायत समितीची एकमेव जागा जिंकता आली मात्र त्यांच्या आघाडीने कॉंग्रेसचे जागोजागी करायचे तेवढे नुकसान केले. पंचायत समितीतील सत्तेत भाजपला या एकमेव सदस्याची गरज आघाडीसोबत असतील.

राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील दोन आमदार उरले सुरले होते. तेथे जयंत पाटील यांनी वाळव्यात राष्ट्रवादीने 11 पैकी 5 जागांवर यश मिळवले. येथे राष्ट्रवादीच्या संभाजी कचरे यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलगा सागर याचा पराभव केला. तासगावमध्ये सुमनताई पाटील यांनी आपला गड निर्विवादपणे राखला. तासगावमधील राष्ट्रवादीने सहापैकी चार जागा जिंकल्या. पंचायत समितीच्या सात जागांसह सत्ता राखली.खासदार संजय पाटील यांना होमग्राऊंडवरच आमदार सुमन पाटील यांनी धुळ चारताना "आरआर' यांचा करिष्मा आजही कायम असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रवादीचा एकहाती किल्ला लढवणाऱ्या जयंत पाटील यांनी पक्षाचे सारे प्रस्थापित नेते पळून जात असताना राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेत विरोधी पक्षाचे स्थान मिळवून देऊन पक्षाची इज्जत राखली आहे.

शिराळ्यात अनेक कौटुंबिक कलहाचे आघात सहन करीत राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी कॉंग्रेसच्या सत्यजीत देशमुख यांच्या मदतीने आमदार शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा पार सुपडासाफ केला. येथे आमदार शिवाजीरावांना मुलाचा पराभवही रोखता आला नाही. एकमेव पणुंब्रे गणातील जागा जिंकता आली. कॉंग्रेसचे नेते पतंगराव कदम यांची पलूस आणि कडेगाव तालुक्‍यांमध्ये पृथ्वीराज देशमुख आणि अरुण लाड यांच्या राष्ट्रवादी-भाजप आघाडीने पुरती धुळधाण उडवली. पतंगरावांचे जावई महेंद्र लाड यांना शरद लाड यांनी कुंडल गटात पराभूत केले. कदम यांची या दोन्ही पंचायत समितीतील सत्ता गेली आहे. येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अरुण लाड यांची आघाडी होती. या आघाडीने पतंगरावांना जोरदार धक्का दिला आहे.

आटपाडीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे घड्याळ विसर्जित करून भाजपच्या कमळात बसलेल्या माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी तालुक्‍यातील चारही जागा जिंकत भाजपच्या यशात भरपूर दान टाकले. कायम दुष्काळी जत तालुका भाजपसाठी मात्र सुकाळाचा ठरला आहे. भाजप आमदार विलासराव जगताप यांनी भाजपला नऊ पैकी सहा जागा जिंकत विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि वसंतदादा घराणे पुरस्कृत विकास आघाडीला धुळ चारली. तब्बल अकरा जागांचा आणि सव्वादोन विधानसभा मतदारसंघाचा पसारा असलेल्या मिरज तालुक्‍यावरील कॉंग्रेसचे निशान स्वातंत्र्यानंतर प्रथमच खाली आले आहे.

मिरज तालुक्‍यात तब्बल 10 जागांसह भाजप पंचायत समितीतील सत्तेच्या उंबरठ्यावर आहे. कॉंग्रेस 7 तर राष्ट्रवादीला 2 तर अपक्ष 2 आणि शेतकरी संघटना एक असे बलाबल आहे. अपक्षांच्या मदतीने भाजप पंचायत समितीत सत्तेत असेल. भाजपला जिल्हा परिषदेत मिरज तालुक्‍यातून 6 जागांसह जिल्हापरिषदेतील सत्तेसाठी मोठा हात मिळाला आहे.

  • भाजपचा दोन्ही कॉंग्रेसला दे धक्‍का
  • कडेगावमध्ये पंचायतीच्या फक्त एका जागेवर पतंगरावांना यश
  • मिरज पंचायत समिती सत्तेतून इतिहासात प्रथमच कॉंग्रेस सत्तेबाहेर
  • पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र पराभूत
  • खासदार संजय पाटील यांना होमग्राऊंडवर सुमन पाटील यांनी चारली धूळ
  • शिराळ्यात शिवाजीराव नाईक यांचा सुपडासाफ, पंचायतीची फक्त एक जागा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com