भन्साळींचा सेट पेट्रोल बॉम्ब टाकून पेटविला?

Sanjay Leela Bhansali's 'Padmavati' set torched in Kolhapur; police probe underway
Sanjay Leela Bhansali's 'Padmavati' set torched in Kolhapur; police probe underway

संजय लिला भन्साळी यांच्या 'पद्मावती' चित्रपटाचा सेट पेट्रोल बॉम्ब टाकून पेटवून दिला असल्याची माहिती पुढे येत आहे. कोल्हापूरजवळील पन्हाळगडाशेजारील मसाई पठारावर चित्रपटाचे चार मार्चपासून शुटिंग सुरू होते. आज (बुधवार) पहाटे चित्रपटाचा महाकाय सेट पेटवून देण्यात आला आहे. 

कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली आहे. त्यांनी दिग्दर्शक भन्साळी यांच्याशीही चर्चा केली. 

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे एक ते दीडच्या सुमारास सुमारे तीस ते चाळीस जणांचा जमाव पेट्रोल बॉम्ब घेऊन पठारावर आला आणि जमावाने पेटवापेटवी सुरू केली. मारहाणीत एक चित्रपट कर्मचारी जखमी झाल्याचे समजते. दुपारपर्यंत याप्रकरणी कोणालाही अटक झालेली नव्हती. 

भन्साळींच्या चित्रपटातील युद्धाच्या प्रसंगाचे चित्रीकरण आजपासून सुरू होणार होते. त्यासाठी सुमारे पंचवीस उंट, हत्ती राजस्थानहून मागविले होते. काही घोडे आधीपासून पठारावरील सेटवर आणले होते. आगीत सेट जळाल्यानंतर उंट आणि हत्ती पन्हाळगडाच्या पायथ्याशीच ठेवले आहेत. 

नांगरे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की पोलिसांचा तपास सुरू आहे आणि काही सुगावा हाती लागला आहे. 

मसाई पठाराकडे जाणारे रस्ते प्रशस्त आणि सुव्यवस्थित आहेत. चार चाकी वाहने घेऊन पठारावर जाता येते. येथे प्राचीन बौद्ध लेणी आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून पठाराचा विकास केला जात आहे. त्याला स्थानिक नागरिकांचेही पाठबळ आहे. या पार्श्वभूमीवर भन्साळी यांच्या प्रसिद्ध चित्रपटाचा सेट पेटविण्याचा उद्योग कसा केला जाऊ शकतो, याबद्दल स्थानिक रहिवाशांमध्ये उलटसुलट चर्चा आहे. 

भन्साळी यांच्या 'पद्मावती' चित्रपटाला राजस्थानमध्येही चित्रीकरणादरम्यान विरोध झाला होता. या चित्रपटात राणी पद्मावतीची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने रंगविण्यात आली असल्याचा आक्षेप राजस्थानमधील काही कडव्या संघटनांनी घेतला होता. रजपूत कर्णी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सेटवर धुडगूस घातला होता. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रिकरण राजस्थानमध्ये थांबविण्यात आले होते. भन्साळी यांनीही राजस्थानमध्ये चित्रिकरण करणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी बोरीवलीमध्ये काही शुटिंग उरकल्याचे सांगण्यात येते. 

'राणी पद्मीनीने स्वतःला अग्निकुंडात झोकून दिले होते. त्या राणीचे चुकीचे शुटिंग छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यात होते आहे आणि तुम्ही हिंदू गप्प का,' असे उचकवणारे मेसेज व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून शुटिंग सुरू झाल्यापासून पन्हाळ्याच्या आसपासच्या गावात मोबाईलवर फिरत होते. त्याचाही या आगीमागे काही संबंध आहे का, यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. 

दरम्यान, जळालेल्या साहित्यामध्ये वेषभूषा मोठ्या प्रमाणावर आहे. हे साहित्य मुख्यतः पेट्यांमध्ये ठेवले जाते. आग लागल्यानंतर कर्मचाऱयांनी आधी घोड्यांची सुटका केली. आगीनंतर काही मिनिटात जमाव गायब झाला, असे कर्मचाऱयांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com