संतोष पोळ खटल्याची सुनावणी एकत्रित नाही 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

सातारा - वाई-धोम खून सत्रातील संतोष पोळच्या विरुद्धचे सर्व सहा गुन्हे एकत्र चालविण्याची सरकार पक्षाची मागणी न्यायालयाने आज फेटाळली. त्यामुळे सहाही खटले स्वतंत्रपणे चालविले जाणार आहेत. 

सातारा - वाई-धोम खून सत्रातील संतोष पोळच्या विरुद्धचे सर्व सहा गुन्हे एकत्र चालविण्याची सरकार पक्षाची मागणी न्यायालयाने आज फेटाळली. त्यामुळे सहाही खटले स्वतंत्रपणे चालविले जाणार आहेत. 

न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांच्यासमोर या खून सत्रातील पहिल्या गुन्ह्याचा खटला सुरू आहे. संतोष पोळवर एकूण सहा खुनांचे गुन्हे दाखल आहेत. हे सर्व खटले एकत्र चालविण्याची विनंती करणारा अर्ज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाकडे केला होता. त्यावर 27 एप्रिलला दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले होते. पोळच्या वतीने ऍड. श्रीकांत हुटगिकर यांनी म्हणणे मांडले होते. त्यामध्ये एकत्रित खटले चालविल्यास आरोपीला बचाव करता येणार नाही. गोंधळाची परिस्थिती होईल. न्यायालयाची दिशाभूल होऊ शकते. सर्व गुन्ह्यांचा उद्देश, साक्षीदार, दोषारोपपत्र वेगळे आहेत. त्यामुळे खटले स्वतंत्र चालवावेत, अशी मागणी केली होती. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश देशपांडे यांनी आज सरकार पक्षाचा अर्ज फेटाळला. खटल्याची पुढील सुनावणी 15 जूनला होणार आहे.