चव्हाण, शिंदे यांच्यात काट्याची टक्‍कर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

बंडखोरीमुळे महिलेच्या आरक्षित जागेवर अनपेक्षित निकाल शक्‍य

सातारा - जलमंदिर आणि सुरुची बंगला या दोन्ही नेत्यांचे निवासस्थान असलेल्या भागात पालिकेचे माजी उपाध्यक्ष, नगरसेवक जयेंद्र चव्हाण व किशोर शिंदे यांच्यात काट्याची टक्कर आहे. प्रभाग ११ मध्ये होत असलेल्या या लढतीतच महिलेच्या आरक्षित जागेवरही बंडखोरांमुळे वेगळा निर्णय लागू शकतो, अशी स्थिती आहे.

बंडखोरीमुळे महिलेच्या आरक्षित जागेवर अनपेक्षित निकाल शक्‍य

सातारा - जलमंदिर आणि सुरुची बंगला या दोन्ही नेत्यांचे निवासस्थान असलेल्या भागात पालिकेचे माजी उपाध्यक्ष, नगरसेवक जयेंद्र चव्हाण व किशोर शिंदे यांच्यात काट्याची टक्कर आहे. प्रभाग ११ मध्ये होत असलेल्या या लढतीतच महिलेच्या आरक्षित जागेवरही बंडखोरांमुळे वेगळा निर्णय लागू शकतो, अशी स्थिती आहे.

भुते बोळ, जुना मोटार स्टॅंड, महात्मा फुले भाजी मंडई, प्रतापगंज एमईसीबी ऑफिस, लोखंडे मळा, सुरुची बंगला, जलमंदिर, शिवम्‌ कॉलनी, जिजामाता कॉलनी, बदामी पार्क, अर्कशाळा, क्रांतिस्मृती असा भौगोलिकदृष्ट्या मोठा परिसर या प्रभागात मोडतो. सुमारे पाच हजार ७०० लोकसंख्येच्या या प्रभागात चार हजार ४०० मतदान आहे. यातील काही भाग हा नगर विकास आघाडीचे नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांचा वॉर्ड आहे. तीन वेळा ते या जागेवरून निवडून आले आहेत. आता फेररचनेमध्ये जुना व नवा भाग यांचे प्रमाण सर्वच ठिकाणी ६०-४० टक्के असे राहिले आहे. 

श्री. चव्हाण यांनी पालिकेचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. दोन्ही वाड्यांवर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. लोकांची कामे करताना वॉर्डाच्या तांत्रिक सिमांची झापडे त्यांनी स्वत:ला कधीच बांधून घेतली नाहीत. त्यामुळे प्रभागाबाहेरही त्यांचा लोकांशी चांगला संवाद व व्यापक संपर्क आहे. 

सातारा विकास आघाडीने या वेळी माजी नगरसेवक संजय शिंदे यांचे धाकटे बंधू किशोर शिंदे यांना संधी दिली आहे. शिंदे यांचा वैयक्तिक स्तरावर चांगला जनसंपर्क आहे. शिवाय संजय शिंदे या भागातून एकदा निवडून गेले आहेत. एक वर्ष स्वीकृत नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या कार्याचाही ‘साविआ’ला फायदा होऊ शकतो. भाजपकडून बसप्पा कोरे यांनीही आव्हान निर्माण करण्याचे चांगले प्रयत्न चालविले आहेत. गेल्या निवडणुकीत ‘साविआ’च्या उमेदवार, माजी नगरसेविका चित्रा कडू यांना अनपेक्षितपणे माघार घ्यावी लागली होती. त्याची सल त्यांच्या मनात आहे. महिलेच्या जागेसाठी या वेळी त्या भाजपच्या उमेदवार आहेत.

अश्‍विनी पुजारी यांनी बंडखोरी केल्याने ‘साविआ’ची डोकेदुखी आणखी वाढली आहे. ‘साविआ’कडून सुमती खुटाळे, तर ‘नविआ’कडून अरुणा पोतदार निवडणूक रिंगणात आहेत. या सर्वांत सरशी कोणाची होणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Web Title: Satara municipal election