टेंभूच्या पाण्यासाठी नऊ कोटींचा निधी 

टेंभूच्या पाण्यासाठी नऊ कोटींचा निधी 

सातारा - टेंभू योजनेतून माणमधील 16 आणि खटावमधील 15 गावांना पाणी देण्यासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी चंद्रकांत पाटील यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे टेंभूचे पाणी माण, खटावला मिळण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत, अशी माहिती माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व अनिल देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जिहे-कठापूरला केंद्रीय अर्थसाह्याशिवाय निविदा प्रक्रिया राबविता येणार नाही, ही अट केंद्राने शिथिल करावी, अशी मागणी ही त्यांनी केली. 

डॉ. येळगावकर म्हणाले, ""महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज मदत आणि पुनर्वसन विभागाकडून नऊ कोटींचा निधी मंजूर केला. यातून वर्षातून दोन वेळा टेंभूच्या पाण्यातून मायणी व महाबळेश्‍वरवाडी हे दोन तलाव भरून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे माण तालुक्‍यातील विडणी, कापूसवाडी, वरकुटे मलवडीसह 16 गावांचा, तर खटाव तालुक्‍यातील मायणीसह 15 गावांना पाणी मिळणार आहे. मायणी तलावात पाणी भरण्यासाठी चार कोटी 75 लाख, तर माणमधील महाबळेश्‍वरवाडी तलावात पाणी भरण्यासाठी चार कोटी 32 लाख इतका निधी मंजूर केला आहे.'' 

जिहे- कठापूर योजनेचा 20 कोटी रुपये निधी शिल्लक आहे, तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाकडून या योजनेसाठी काही तरतूद होईल; पण नवीन शासन निर्णयामुळे हा निधी खर्च करता येणार नाही. केंद्रीय अर्थसाह्य मिळाल्याशिवाय निविद प्रक्रिया राबविता येणार नाही. त्यामुळे केंद्राच्या निधीबाबतची अट राज्य व सध्या उपलब्ध निधीसाठी शिथिल करावी, अशी आमची मागणी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही आम्हाला ग्वाही दिली आहे. राज्य शासनाने केंद्राकडे टेंभूसाठी 780, उरमोडीसाठी 350 तर जिहे-कठापूरसाठी 390 कोटींची मागणी केली आहे, असे त्यांनी नमूद केले. या वेळी सचिन गुदगे उपस्थित होते. 

वीज वितरणने कृषी पंपाची थकबाकी वाढल्याने कनेक्‍शन तोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भात आम्ही बारामती वीज वितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून शेतकऱ्यांना सवलत देण्याची मागणी केली होती. त्यांनी ती मान्य केली असून, हॉर्सपॉवरनुसार बिले भरण्याची मुभा दिली आहे. त्यातूनही कोणाचे कनेक्‍शन तोडले असेल, तर शेतकऱ्यांनी भाजपच्या नेत्यांशी संपर्क करावा, असे आवाहन डॉ. येळगावकर यांनी केले आहे. 

आमगार गोरेंनाही लागणार मोका ः येळगावकर  
जिहे- कठापूर योजनेच्या निधीबाबत आमदार जयकुमार गोरे भंपक विधाने करत आहेत. शेखर गोरेंपाठोपाठ त्यांनाही मोका लागणार आहे, यातून सुटले तर ते आमच्यासोबत या योजनेच्या पूर्ततेच्या कामात सहभागी होऊ शकतील, अशी टीका डॉ. येळगावकर यांनी केली. 

ते म्हणाले, ""मुळात गोरेंच्या समाजातील प्रतिमेला गळती लागली आहे. पहिली त्यांनी स्वतःची ओहोटी सावरावी. उगाच टीका करण्यापेक्षा जिहे-कठापूर योजनेच्या पूर्ततेसाठी चांगल्या कामात सहभागी व्हावे. गोरेंनी त्यांच्या आमदारकीच्या काळात 380 कोटी रुपयांचा निधी आणला असे सांगतात, तर मग ही योजना का पूर्ण झाली नाही? या योजनेला 180 कोटींची गरज आहे. ते भंपक विधान करत आहेत. त्यांच्या बंधूंपाठोपाठ त्यांनाही मोका लागणार आहे, आम्ही तशी मागणीही केली आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com