हेल्मेटसक्तीचा फेरविचार न झाल्यास आंदोलन

सातारा - कायदा राबविण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. मात्र, त्रासदायक कायदे- नियम पाळायला त्यांनाही जिवावर येते. हेल्मेटसक्तीच्या निर्णयापूर्वी मुक्त ड्रायव्हिंगचा आनंद घेणाऱ्या या पोलिस मामांना हेच तर सांगायचे नसेल.
सातारा - कायदा राबविण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. मात्र, त्रासदायक कायदे- नियम पाळायला त्यांनाही जिवावर येते. हेल्मेटसक्तीच्या निर्णयापूर्वी मुक्त ड्रायव्हिंगचा आनंद घेणाऱ्या या पोलिस मामांना हेच तर सांगायचे नसेल.

‘सकाळ’कडे येणाऱ्या प्रतिक्रियांचा सूर; सर्वच घटकांवर येणार ताणतणाव

सातारा - हेल्मेट सक्तीच्या निर्णयाबद्दल दिवसेंदिवस नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘सकाळ’कडे येणाऱ्या प्रतिक्रियांचा ओघही वाढतो आहे. लोकभावनेचा विचार करून पोलिस प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असाही काही प्रतिक्रियांचा सूर आहे. 

महिलांना शहरात हेल्मेटसक्ती नको 
भाजी आणायला गेले तरी भाजीची पिशवी, पैशाची बॅग, गाडीची चावी, मोबाईल हे सगळं सांभाळायचंच किती कसरतीच असते. ते तिलाच माहिती. त्यात साडी नेसली असेल किंवा ओढणी असेल तर ती नीट सावरून घ्यायची आणि या सगळ्यात आता हे हेल्मेटच धूड कसं सांभाळायचं आणि ते ठेवायचं कुठ? मुलांना शाळेत, क्‍लासला सोडायला जाताना यापेक्षा मोठी कसरत होणार. तसंही शहरात महिला वेगाने गाडी चालवत नाहीतच आणि प्रयत्न केला तरी गर्दीमुळे ते शक्‍य होत नाही. ज्यांना सवय नाही किंवा बाजूला मान वळवून बघणे जमलं नाही, तर उलट अपघात होऊ शकतो. म्हणून मला तर वाटत महिलांना हेल्मेट सक्ती नकोच नको. लोकप्रतिनिधींनीही याबाबत ठोस भूमिका घेणे आवश्‍यक आहे.
- सौ. मनीषा विनोद मगर, सातारा.

हेल्मेटसक्ती ही केवळ प्रसिद्धीसाठी
कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार न करता निव्वळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी घेतलेला निर्णय म्हणजे हेल्मेट सक्ती. विश्‍वासरावांच्या आदेशाने जनसामान्यांच्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या अपेक्षांनाच तडा गेला आहे. शहरात खरोखरच त्याची गरज आहे का? रस्त्याची स्थिती, गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग, बेफाम वाहन चालवणाऱ्यांवर नियंत्रण आणले तरी भागू शकते. नियोजनबद्ध सार्वजनिक वाहनांचा वापर, शाळा, महाविद्यालयांच्या वेळा, अशा उपाय योजनाही करता येतील. संबंधित विषयातील तज्ज्ञांची मते सार्वजनिक करून मग आणि मगच असा एखादा टोकाचा निर्णय घेणे रास्त ठरते. या निर्णयाचा फेरविचार केला, तरच परिक्षेत्रातील लोकांचा त्यांच्यावरील विश्‍वास दृढ होईल.
- हर्ष रामचंद्र भोसले

जनतेचा उद्रेक होईल
महामार्गाव्यतिरिक्त हेल्मेट सक्ती अनावश्‍यक आहे. त्याचा फेरविचार करावा. अन्यथा जनतेतून उद्रेक होईल. महिला, वयोवृद्ध यांना अनेक वेळा छोट्या अंतरासाठी दुचाकीवरून प्रवास करावा लागतो. दाट वस्ती, अरुंद रस्ते, पार्किंगची गैरसोय अशा कारणांमुळे हेल्मेट वापरणे व वागविणे अडचणीचे होणार आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार करून शहरात हेल्मेट सक्तीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा.
- प्रकाश बडेकर

‘आग सोमेश्‍वरी...’!
हेल्मेटसक्ती म्हणजे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. वाहतुकीच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक प्रलंबित असताना राज्य व राष्ट्रीय महामार्गावरच हेल्मेटसक्ती करावी. आधीच विविध कारणांनी त्रस्त सर्वच घटकांवर ताणतणाव आणू नयेत. 
- प्रा. डॉ. धनंजय देवी, सातारा

पगडी मिरवायच्या स्थितीत माणूस हवा?
हेल्मेटसक्तीमुळे प्रश्न सुटणार आहे का ? हेल्मेट मुळे आपण कदाचित डोके वाचवू शकू; पण शारीरिक दुखापत होऊन कायमचे अपंगत्व आले तर त्याला जबाबदार कोण? सर सलामत तर पगडी पचास असे म्हणून ती पगडी मिरवायच्या स्थितीत तर माणूस पाहिजे. तेव्हा हेल्मेटसक्ती करण्यापूर्वी सरकारने इतर कारणांमुळे होणारे अपघात कसे टाळता येतील याकडे लक्ष द्यावे.
- साधना मदन पिसे, शाहूपुरी, सातारा 

सुरक्षेसाठी गरजेचेच
हेल्मेटसक्ती ही सुरक्षेसाठीच आहे. ४०० ते ५०० रुपयांच्या बदल्यात आपल्या जिवाची किंमत किती? हे ज्याचे त्यानेच ठरवावे. इतर वेळी आपण नांगरे-पाटील साहेबांच्या पोस्ट लाइक करतो. मग ही चांगली बाब का नको? बेकायदेशीर धंदे हा विषय वेगळा आहे. महिला आणि मुलांनी शहरात हाफ हेल्मेट वापरल्यास कुटुंबाची मोठी चिंता कमी होईल. 
- शीतल दोशी, सातारा

सामान्य खर्चात मरतोय
माझ्या मुलाने हेल्मेट आणले. तिसऱ्या दिवशी चोरीला गेले. चोऱ्या करणारे मोकाट चोऱ्या करतात. चेनस्नॅचिंग करायला हेल्मेट वापरले जाते. पोलिस वाहतूक नियंत्रण करताना दिसत नाहीत. मात्र, नो एंट्रीच्या दुसऱ्या बाजूला वाटमारी करत उभे दिसतात. हेल्मेट उत्पादकांची चलती होणार, सामान्य मात्र खर्चातच मरतोय. 
- अजित वाकनीस, सातारा

महिलांना हेल्मेटसक्ती नको
महिलांना हेल्मेटसक्ती अजिबात नको...आणि शहरात तर नकोच नको. भाजी आणायला गेली, तर तिने भाजीची पिशवी सांभाळायची, पैशांची, की गाडीची चावी? हे सगळं सांभाळायचं किती कसरतीचं असतं, ते तिलाच माहिती. त्यात साडी नेसली असेल किंवा ओढणी असेल तर ती नीट सावरून घ्यायची आणि या सगळ्यात आता हे हेल्मेटचं धूड कुठं ठेवायचं? मुलांना शाळेत सोडायला जाताना तर यापेक्षा मोठी कसरत असते. तेव्हा किती समस्या येऊ शकते या हेल्मेटमुळे? आणि तसंही शहरात महिला वेगाने गाडी चालवत नाहीत. प्रयत्न केला तरी ते गर्दीमुळे शक्‍य होतं नाही. हेलमेटची ज्यांना सवय नाही किंवा बाजूला मान वळवून बघणे जमलं नाही तर ते उलट अपघाताचं कारण होऊ शकतं. म्हणून मला तर वाटते, महिलांना हेल्मेटसक्ती नकोच नको.
- सौ. मनीषा वि. मगर, सातारा

हेल्मेट सक्‍ती, नव्हे डोके दुखी
हेल्मेट वापरल्याने दुचाकीवरील माणूस ओळखू शकत नाही. या सक्‍तीने ज्येष्ठांपासून तरुणपिढीसह मानेचा त्रास, घाम येणे; पण महत्त्वाचे म्हणजे दुकानात मंडईत इत्यादी ठिकाणी हेल्मेट गाडीवर ठेवून जाणे शक्‍य नाही. कॉलेज विद्यार्थी- विद्यार्थिनी ठेवणार कोठे? याचा विचार करावा लागेल. म्हणून सातारा व सातारा जिल्ह्यासह सक्‍ती रद्द करावी. महामार्गावर सक्‍ती योग्य आहे. सर्वांनीच सर्व ठिकाणी वाहनाचा वेग कमी ठेवावा असे मला वाटते.
- अ. अ. वैद्य, सातारा

...तर हेल्मेट सक्‍तीची गरज नाही
साताऱ्यात गेल्या ४०-५० वर्षांपासून रस्त्यामध्ये विशेष सुधारणा झालेल्या नाहीत. चौकांचे आणि रस्त्यांचे आकुंचन झाल्याने पदपथावरील अतिक्रमणांमुळे विद्यार्थी महिला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. साताऱ्यातील खालचा रस्ता हे त्यासाठी उत्तम उदाहरण आहे. आपण आपल्या भाषणात उल्लेख करता त्याप्रमाणे प्रामुख्याने सर्व चौक, खड्डेविरहीत रस्ते आणि पदपथ रिकामे करून ते आखून द्यावेत. वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होऊन दुचाकीधारकांची संख्या कमी होऊन अपघातात घट होईल. याप्रमाणे उपाययोजना झाल्यास हेल्मेटसक्‍तीची गरज राहणार नाही.
- ईश्‍वर कदम, सातारा

नांगरे-पाटील साहेब... इतर मुद्द्यांकडेही लक्ष द्या!

दुचाकीवर हेल्मेटसक्तीचा काढलेला आदेश शहर हद्दीत लागू करणे अतार्किक, अव्यवहार्य आणि नागरिकांना अतिशय त्रासदायक आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी या मुद्द्यांकडेही थोडे लक्ष द्यावे...
हेल्मेटच्या वापराने गुन्हेगारी वाढेल. हेल्मेट चोरीला जातील. गुन्हे वाढून पोलिसांची डोकेदुखी व जनतेचा त्रास वाढेल.
हेल्मेटसक्तीने लोकांच्या खिशाला अनावश्‍यक भार पडेल. गाडी विक्रेत्यांना हेल्मेट विक्रीची सक्ती केली तरी ते विक्रेते हे ग्राहकांच्याच खिशातून किंमत वसूल करतील. 
दोन-तीन महिन्यांत हेल्मेटची विक्री झाली की नियम बंद व्हायचा आणि हेल्मेटचा वापरही. हेल्मेट उत्पादक, विक्रेते मालामाल आणि ग्राहकांवर अनावश्‍यक खर्चाचा भार पडणार.
प्रशासकीय अधिकारांचा वापर हा जनहितार्थ स्वागतार्ह आहे. मात्र ‘आले मनी लादले जनी’ असे वर्तन योग्य नाही. यापूर्वी महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लोकांचे जीव घेणाऱ्या कंपनीविरोधात कारवाई शून्य आहे. त्याकामी कंपनीवर एकही गुन्हा दाखल नाही.
खराब रस्त्याबाबत आपल्यामार्फत काहीच सूचना अगर कारवाई होत नाही. चांगले रस्ते व्हावेत जेणेकरून अपघात कमी होतील, याबाबत शासकीय स्तरावर धोरण नाही.
हेल्मेटसक्तीबाबतचा पोलिस विभागाचा अहवाल जनतेसमोर प्रसिद्ध करावा. जेणेकरून हा निर्णय कसा उपयुक्त आहे, हे जनतेला पटवून देता येईल.
हेल्मेट वापराने चालकांना मानेचा, मणक्‍याचा त्रास होतो. मागे पाहणे अवघड जाते. याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचे घेतलेल्या मतांचा अहवाल जनतेसमोर खुला व्हावा. 
- धनंजय फरांदे, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com