नगरसेवकाकडून अधिकाऱ्यांना दांडक्‍याची भाषा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

सातारा - सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर लोकांची सुचविलेली कामे करा, नाही तर दांडकं घेऊन मागे लागावे लागेल, अशा आशयाचे वक्तव्य भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी केल्याने गोंधळ उडाला. मुख्याधिकाऱ्यांना उद्देशून हा प्रकार झाल्याचा आरोप करत पालिका कर्मचारी काम बंद करून आंदोलनात सक्रिय झाले. सत्ताधारी आघाडीनेही कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिल्याने आज दुपारनंतर दिवसभर पालिकेचे कामकाज बंद राहिले. दरम्यान, सायंकाळी उशिरा श्री. जांभळे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. 

बोलू न देता पालिकेची सभा अवघ्या दहा मिनिटांत गुंडाळण्यात आल्याने सर्वच विरोधी सदस्य अस्वस्थ होते. भाजपचे सदस्य धनंजय जांभळे यांचे अजेंड्यावरील विषय डावलण्यात आल्याने त्यांचाही पारा चढला होता. सभा संपल्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना जाब विचारण्यास सुरवात केली. विकासकामे केली नाहीत तर दांडकं घेऊन मागे लागावे लागेल, असे ते म्हटल्याने गोंधळ उडाला. साडेबाराच्या सुमारास अधिकारी- कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद केले. तोपर्यंत खासदार उदयनराजे भोसले पालिकेत दाखल झाले. त्यांनी झालेल्या प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगत अशा पद्धतीने कोणी दमदाटीची भाषा करत असेल तर मी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, असे आश्‍वासन दिले. मुख्याधिकाऱ्यांनी संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी पालिका प्रवेशद्वारावर येऊन निषेधाच्या घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत पालिकेचे पदाधिकारीही आंदोलनात सहभागी झाले. रात्री शहर पोलिस ठाण्यात धनंजय जांभळेंविरुद्ध शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. 

जनतेच्या कामांसाठी बोललो - जांभळे 
रस्त्यावरचे खड्डे, पिण्याचे पाणी या नागरिकांच्या समस्यांबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे मी उद्वेगातून तसं म्हणालो. माझी भावना सार्वत्रिक आहे; मुख्याधिकाऱ्यांनी वैयक्तिक घेतले. दीड- दीड वर्षे पाठपुरावा करूनही लोकांशी निगडित सार्वजनिक सुविधांची कामे होत नसतील, तर जनतेने त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रतिनिधी म्हणून मी आणखी काय करायला हवे होते? असा सवाल धनंजय जांभळे यांनी "सकाळ'शी बोलताना केला. 

Web Title: satara news Bad language for the officers from the corporator