बांधकामाची परवानगी आता आॅनलाइन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

सातारा - सातारकरांना बांधकामाच्या परवानगीसाठी आता पालिकेत जाण्याची आवश्‍यकता राहणार नाही. बांधकाम परवानगी ऑनलाइन मिळणार आहे. बांधकाम प्रस्ताव सादर केल्यानंतर तो मंजुरीच्या कोणत्या टप्प्यावर आहे, याचीही माहिती संबंधित विकसकाला ऑनलाइन समजेल. पालिकेची याबाबतची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाइन परवान्याचा लाभ नागरिकांना घेता येईल.

सातारा - सातारकरांना बांधकामाच्या परवानगीसाठी आता पालिकेत जाण्याची आवश्‍यकता राहणार नाही. बांधकाम परवानगी ऑनलाइन मिळणार आहे. बांधकाम प्रस्ताव सादर केल्यानंतर तो मंजुरीच्या कोणत्या टप्प्यावर आहे, याचीही माहिती संबंधित विकसकाला ऑनलाइन समजेल. पालिकेची याबाबतची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाइन परवान्याचा लाभ नागरिकांना घेता येईल.

महापालिका स्मार्ट होत असताना आता राज्य शासनाच्या आयटी विभागाने नगरपालिकांनाही स्मार्ट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिकांमधील नकाशे मंजुरीतील घोळ दूर करण्यासाठी ‘बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टिम’ (बीपीएमएस) सुरू करण्यात येत आहे. या प्रणालीमध्ये हाताने नकाशे तयार करताना होणाऱ्या चुका टाळल्या जातील, तसेच ‘चलता है’सारख्या वृत्तीला आळा बसणार असून, जलद सेवाही मिळणार आहे. 

बांधकाम परवानगी घेण्यासाठी वास्तुविशारद, अनुज्ञप्तीधारक, बांधकाम निरीक्षकांना पालिकेत जावे लागते. त्यात अनेकदा अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब लक्षात घेऊन शासनाने बांधकाम परवानगीसाठी ‘बीपीएमएस’ ही प्रणाली विकसित केली. त्याद्वारे बांधकाम परवानगी देण्याचे निश्‍चित करण्यात आले. याबाबत अधिक माहिती देताना सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सांगितले, की बीपीएमएस प्रणाली सुरू करण्याबाबत शासनाने पावले उचलली असून, साताऱ्यात आपण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अत्याधुनिक पद्धतीने इमारत बांधकाम 

नकाशे मंजूर करण्याची ऑनलाइन पद्धती कार्यान्वित करत आहोत. वास्तुविशारद ऑनलाइनद्वारे पालिकेकडे बांधकाम प्रस्ताव सादर करेल.  भागनिरीक्षक सर्व कागदपत्रांची छाननी करतो. हा प्रस्ताव नगररचनाकारांकडे गेल्यानंतर ते प्रस्तावातील तांत्रिक बाबी तपासतात. नकाशा, एफएसआय, साईड मार्जिन बरोबर आहे का, विकास आराखड्याप्रमाणे त्याचे बांधकाम आहे का आदी बाबी नगररचनाकार तपासतात. त्यांच्या शिफारशीनंतर बांधकाम परवानगीवर मुख्याधिकाऱ्यांची अंतिम स्वाक्षरी होते. हे सर्व टप्प्पे ऑनलाइन प्रणालीतून पार पडणार आहेत.

बांधकाम परवान्याठी संबंधिताला आता पालिकेत जावे लागणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रणालीमुळे तुमचा प्रस्ताव कुठे, कोणाकडे प्रलंबित आहे आणि किती दिवसांपासून आहे हे समजणार आहे. ऑनलाइन असल्याने विशिष्ठ हेतू ठेवून ‘बघतो, करतो’ अशी उत्तरे यापुढे अधिकाऱ्यांना देता येणार नाहीत. बांधकाम परवाना देण्यासाठी यापूर्वी होणाऱ्या अनेक चुकीच्या गोष्टींना पायबंद बसणार आहे. शिवाय बांधकाम परवाना ३० दिवसांत देण्याचे बंधन पालिका प्रशासनावर असणार आहे.

‘‘बीपीएमएस ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी काही मूलभूत गोष्टींवर काम होणे गरजेचे होते. आमच्याकडे प्रशासकीय पातळीवर हे काम नुकतेच पूर्ण झाले असून, ऑनलाइन परवाना देण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे.’’
शंकर गोरे, मुख्याधिकारी, सातारा पालिका

Web Title: satara news Construction is now permitted online