सावकार खंड्याची पायी "वरात'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

पोलिसांनी न्यायालयापर्यंत नेले चालवत; तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी

पोलिसांनी न्यायालयापर्यंत नेले चालवत; तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी
सातारा - खून, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, अपहरण व खासगी सावकारीचे एकूण 21 गुन्हे दाखल असलेला कुविख्यात सावकार व खंडणीखोर प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकर व त्याच्या साथीदाराच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल मुंबई येथे मुसक्‍या आवळल्या. शहर पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी आज त्याची सातारा शहरातून पायी वरात काढत त्याला न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने दोघांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सचिन नरेंद्र पंडित (रा. न्यू विकासनगर सातारा) असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे.

खासगी सावकारीच्या वसुलीसाठी अपहरण, खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, अपहरण करून मारहाण करणे, जबरी चोरी, फसवणूक अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे अपराध करून खंड्याच्या टोळीने साताऱ्यात दहशत माजविली होती. गेल्या काही महिन्यांत त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात दरोडा, आत्महत्येला प्रवृत्त करणे, जबरी चोरी व सावकारीचे नऊ गुन्हे दाखल झाले. पहिल्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर खंड्या फरार झाला होता. गेल्या तीन महिन्यांपासून तो फरार होता. अनेक प्रयत्न करूनही तो पोलिसांच्या ताब्यात सापडत नव्हता. त्यावरून पोलिसांना टीकेचे धनीही व्हावे लागले होते.

त्यामुळे खंड्याला तातडीने जेरबंद करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी शहर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्या होत्या. काल खंड्या अटकपूर्व जामीन अर्जासाठी मुंबईत येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी एक पथक मुंबईला रवाना केले होते. सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, हवालदार विजय कांबळे, रामा गुरव यांचा त्यात समावेश होता. त्यांनी उच्च न्यायालयाच्या परिसरात सापळा लावून खंड्या व सचिनला अटक केली. त्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

शहर पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनीही खंड्याला आज त्याची जागा दाखवून दिली. नागरिकांवर दहशत माजवून मोठ्या अलिशान गाड्यांतून फिरणाऱ्या खंड्याची पोलिसांनी आज न्यायालयापर्यंत पायी वरात काढली. स्वत: निरीक्षक सारंगकरांनी याचे नेतृत्व केले. याची आज दिवसभर शहरात चर्चा होती. न्यायालयाने दोघांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस कोठडी सुनावल्यानंतरही त्याला चालतच पोलिस ठाण्यापर्यंत आणण्यात आले.