कोठडीतून पळालेल्या संशयिताला पकडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

सातारा - शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून पळून गेलेल्या दरोडेखोरास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) आज कामोठा ब्रिज (नवी मुंबई) येथे अटक केली. त्याला 48 तासांच्या आत पकडण्यात यश मिळविल्याबद्दल पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी एलसीबीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

सातारा - शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून पळून गेलेल्या दरोडेखोरास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) आज कामोठा ब्रिज (नवी मुंबई) येथे अटक केली. त्याला 48 तासांच्या आत पकडण्यात यश मिळविल्याबद्दल पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी एलसीबीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे (रा. सायबू पाटलाचा वाडा, ढवळ, ता. फलटण) असे त्याचे नाव आहे. लोणंद येथे दरोड्याच्या तयारीत असताना लोखंडेसह पाच जणांच्या टोळीला एलसीबीने अटक केली होती. खंडाळा न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. तपासासाठी ते सर्व जण एलसीबीच्या ताब्यात होते. त्यांना शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते.

रविवारी (ता. 1) चंद्रकांत सकाळी पोलिस कोठडीतील स्वच्छतागृहात गेला. तेथील खिडकीचे गज काढून त्याने धूम ठोकली होती. या प्रकरामुळे पोलिस दलात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी चंद्रकांतला तातडीने पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक पद्‌माकर घनवट यांनी उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले होते.

आज चंद्रकांत हा कळंबोली (मुंबई) येथे असल्याची माहिती श्री. घनवट यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी श्री. जऱ्हाड यांच्यासह सहायक निरीक्षक विकास जाधव, सहायक फौजदार सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, हवालदार तानाजी माने, उत्तम दबडे, रामा गुरव, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, मुबीन मुलाणी, अर्जुन शिरतोडे, विक्रम पिसाळ, मारुती लाटणे, नीलेश काटकर, मनोज जाधव, संजय जाधव, विजय सावंत व मारुती अडागळे यांना मुंबईकडे रवाना केले. या पथकाने कामोठा ब्रीज येथे एका वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चंद्रकांतला पकडले.

आणखी गुन्हे उघड होणार
या टोळीकडून पुणे व सातारा जिल्ह्यांतील 11 गुन्हे उघडकीस आले आहेत, तसेच 40 हजार 250 रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.