लाचखोर हवालदाराला दोन वर्षे सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

सातारा - निनावी तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार शंकर दत्तात्रय तिताडे (वय 59) यास आज येथील विशेष न्यायालयाने विविध कलमांखाली दोन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

शंकर दत्तात्रय तिताडे हे शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. एप्रिल 2011 मध्ये पोलिसांत एक निनावी तक्रात अर्ज दाखल झाला. त्या अर्जावरून गुन्हा दाखल न करण्यासाठी हवालदार तिताडे यांनी संबंधित व्यक्तीकडे लाचेची मागणी केली. गुन्हा दाखल न झाल्यास होणारी बेअब्रू टाळता येईल. प्रकरण मिटवता येईल, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीचा घेतलेला मोबाईल व सीमकार्ड परत देण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. पीडिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पाच हजार रुपयांची लाच घेताना तिताडे याला पकडण्यात आले होते. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक जी. बी. ओमासे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ऊर्मिला फडतरे यांनी काम पाहिले. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी हवालदार तिताडे याला लाच घेतल्याच्या गुन्ह्यात दोषी ठरविले.