मृत्यूच्या दाढेत मराठवाडी धरणग्रस्तांचे जगणे सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

ढेबेवाडी - एका बाजूला घनदाट जंगल आणि दुसरीकडे धरणाचा जलाशय अशा बिकट स्थितीत मराठवाडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील घोटीलमध्ये सहा कुटुंबे जीव मुठीत धरून एक एक दिवस कंठत आहेत. पुनर्वसनाच्या काही प्रलंबित प्रश्‍नांबरोबरच अडचणींमुळे या कुटुंबांनी  अजून गाव सोडलेले नाही. गवत आणि झुडपांनी वेढलेल्या घरांमध्ये सहा कुटुंबातील २२ जण एकमेकांना धीर देत राहात आहेत.

ढेबेवाडी - एका बाजूला घनदाट जंगल आणि दुसरीकडे धरणाचा जलाशय अशा बिकट स्थितीत मराठवाडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील घोटीलमध्ये सहा कुटुंबे जीव मुठीत धरून एक एक दिवस कंठत आहेत. पुनर्वसनाच्या काही प्रलंबित प्रश्‍नांबरोबरच अडचणींमुळे या कुटुंबांनी  अजून गाव सोडलेले नाही. गवत आणि झुडपांनी वेढलेल्या घरांमध्ये सहा कुटुंबातील २२ जण एकमेकांना धीर देत राहात आहेत.

घोटीलचे पुनर्वसन सांगली जिल्ह्यातील कोतीज आणि सातारा जिल्ह्यातील ताईगडेवाडी गावठाणात करण्यात आले आहे. जंगलाला चिटकून अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेल्या घोटीलमध्ये मूलभूत सुविधांचा पूर्वीपासूनच अभाव आहे. गावातील सुमारे २५८ कुटुंबांपैकी बहुतांशी कुटुंबांचे नवीन गावठाणांमध्ये स्थलांतर केले असले तरी सहा कुटुंबांनी मात्र अजून मूळ गाव सोडलेलेच नाही. या कुटुंबांमध्ये २२ जणांचा समावेश असून पुनर्वसित ठिकाणच्या जमिनींचे आणि पुनर्वसनाचे रखडलेले प्रश्‍न, तिथे पाळीव जनावरे संभाळण्यात येणाऱ्या अडचणी अशी कितीतरी कारणे त्यांच्या येथेच राहण्यामागे लपली आहेत. जे येथून स्थलांतरित झाले त्यापैकी काहीजणांनी आपली जुनी घरे मोडली असली तरी अनेकांनी ती तशीच ठेवली आहेत. या गराड्यातच ही सहा कुटुंबे विखरून परंतु, एकमेकांना धीर देत वास्तव्य करीत आहेत. गावातील अंतर्गत रस्ते व गटारांचे अस्तित्व संपले असून, घरांना गवत व झुडपांचा चोहोबाजूंनी वेढा पडला आहे. चिटकूनच घनदाट जंगल असल्याने रानडुकरे आणि गव्यांचे कळप आणि बिबटे अनेकदा सहज नजरेला पडतात. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या भात शेतीचा डुकरे आणि गवे फडशा पाडतात. अनेकदा घरांतून शेळी आणि कुत्रे घेऊन बिबट्या जंगलात पसार होतो. एका बाजूला जंगल आणि दुसऱ्या बाजूला जलाशय अशा कोंडीत ही कुटुंबे जीवन कंठत आहेत. पावसाळ्यात नदीवरील छोटा पूल पाण्याखालीच असतो. या गावापासून दोन किलोमीटरवर मेंढ हे गाव आहे. घोटीलमधील त्या कुटुंबांना दुकानातून साधी काडीपेटी आणायची झाल्यास मेंढ गाठावे लागते. पावसाळ्यात जलाशय तुडुंब असल्यावर डोंगराच्याकडेने सहा किलोमीटरचा वळसा घालून मेंढला जावे लागते. 

गवत आणि झुडपांनी परिसर वेढल्याने घरात सर्प घुसण्याचे प्रकारही सतत घडतात. काही जनावरांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे धरणग्रस्त सांगत आहेत. गावात वीजपुरवठा सुरू आहे. मात्र, वीजवाहिन्या हाताने स्पर्श होईल इतपत खाली लोंबकळत आहेत. स्ट्रीट लाईटचा अभाव असल्याने हे गाव रात्री अंधारात गुडूप होते. सहाही कुटुंबे वन्यप्राण्यांच्या भीतीने रात्रभर स्वतःला घरांमध्ये अक्षरशः कोंडून घेतात. रात्री घरांजवळून कानावर येणारे वन्यप्राण्यांचे आवाज थरकाप उडवितात. वन्यप्राण्यांचा सुगावा लागावा म्हणून या कुटुंबांनी एक-दोन कुत्री पाळली आहेत. बाहेर खट्ट वाजले तरी त्यांचे भुंकणे सुरू होते. मराठवाडी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा २० वर्षांपासूनचा गुंता सोडविण्यासाठी शासनाकडून सध्या वेगवान हालचाली सुरू असताना त्यांना या कुटुंबांचे जीवघेणे जगणे दिसत नाही का...? असाही सवाल उपस्थित होत आहे. जबाबदार शासकीय यंत्रणा जोपर्यंत प्रत्यक्षात या गावांमध्ये येऊन प्रत्येक कुटुंबाचे प्रश्‍न समजावून घेऊन त्यांची जागेवरच तड लावत नाही तोपर्यंत धरणग्रस्तांचे हे मत्यूच्या दाढेतील जगणे सुरूच राहणार असल्याचे चित्र आहे.

एका विद्यार्थिनीसाठी प्राथमिक शाळा सुरू! 
घोटीलमधील प्राथमिक शाळा एका विद्यार्थिनीसाठी सुरू आहे. या शाळेत साक्षी पवार ही चिमुकली एकटीच शिकते आहे. एक शिक्षक तिथे कार्यरत आहेत. माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या तेथील दोन विद्यार्थिनींना मात्र नदी ओलांडून मेंढला जावे लागते.