डॉल्बीचे झाले ‘विसर्जन’...तरीही!

डॉल्बीचे झाले ‘विसर्जन’...तरीही!

यंदाच्या गणेशोत्सवात पोलिस प्रशासनाच्या पुढाकारामुळे डॉल्बीचे ‘विसर्जन’ झाले. गणेशोत्सव ‘शांततेत’ पार पडला असला, तरी विसर्जन मिरवणुकीतील काही त्रुटी पुन्हा अधोरेखित झाल्या. या त्रुटी अंगवळणी पडण्याआधीच सुधारल्या गेल्या तर साताऱ्यातील गणेश विसर्जनाला सांस्कृतिक व धार्मिक महोत्सवाचे स्वरूप देता येईल. त्यासाठी पालिकाच नव्हे तर लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रमुख सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. 

गेल्या ११ दिवसांच्या मुक्कामानंतर गणरायाला शाहूनगरीने निरोप दिला. पोलिसांनी निर्धाराने या वर्षीच्या उत्सवातून डॉल्बीला फाटा दिला गेला. परिणामी हृदयातील कोणत्याही अतिक्ति धडधडीविना गणेशभक्तांना शांततेत व अधिक मोकळ्या वातावरणात  मिरवणूक पाहता आली. पारंपरिक वाद्यांना उर्जितावस्था मिळाल्याचेही जाणवले. हालगी, झांज, ढोल-ताशे, ढोल-करंड, बॅंड ही वाद्ये आबालवृद्धांना ठेका धरायला लावत होती. महिला व युवतींचा वाढता सहभाग हे अधिक सुसंस्कृत मिरवणुकीचे सुचिन्हच म्हणावे लागेल. काही मंडळांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्य व मर्दानी खेळांमुळे मिरवणूक देखणी झाली. पोलिस, गृहरक्षक दल, पालिका व वीज कंपनीचे कर्मचारी दोन दिवस जागले. गणेशभक्तांनी केलेल्या सहकार्यामुळे हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडला. 

या कौतुकाच्या चार गोष्टी असल्या, तरी त्यातील त्रुटी कोणत्याही संवेदनशील सातारकरास विचार करायला लावणाऱ्या आहेत. राजपथावर, शाहू चौकाकडून येणारी मंडळी कमानी हौदावरून मिरवणुकीच्या उलट दिशेने मोती चौकाकडे जात होती. त्यामुळे राजपथावर अनावश्‍यक गर्दी व त्यातून ढकलाढकली होऊन मिरवणुकीच्या शिस्तीला गोलबोट लागत होते. पाच वाजता मिरवणूक सुरू झाली, तरी बहुतांश मंडळे रात्री नऊ- दहानंतरच येत होती. पोलिसांनी वादकांची संख्या ३० हवी, असे जाहीर केले. प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. काही मंडळांमध्ये कार्यकर्ते दहा-बारा आणि भाडोत्री वादक ६० ते ७० असे विचित्र चित्र होते. वादकांच्या संख्येमुळे शनिवार चौक ते पंचमुखी मंदिरापर्यंत गर्दीमुळे गणेशभक्त, विशेषत: स्त्रिया व बालकांचे चेंगराचेंगरीत हाल झाले.

रात्री एकनंतर मिरवणुकीतील प्रेक्षणीय भाग व कार्यकर्त्यांचा उत्साह पूर्णत: संपला होता. दोन वाजेपर्यंत बहुतांश मंडळे राधिका चौकापर्यंत पोचलीही होती, तरीही मानाचा शंकर-पार्वतीचे विसर्जन होण्यास सकाळ उजाडली. हे अनावश्‍यक ‘जागरण‘ कशासाठी व कोणासाठी? विसर्जन लवकर संपल्याने गणरायावरील भक्तीमध्ये काही फरक पडणार आहे का? याचा विचार सर्व कार्यकर्ते व प्रशासनाने केला पाहिजे.  
 

या कराव्यात उपाययोजना....
सार्वजनिक मंडळांच्या सहभागातून समिती तयार करावी
राजकारणविरहित समिती एकंदर गणेशोत्सवाचे नियोजन करेल
विसर्जन मिरवणुकीचे नियोजन व अंमलबजावणीचे संयोजन 
हीच समिती करेल
खासदार, आमदार तसेच पालिकेने याकामी पुढाकार घ्यावा 
साताऱ्याचा गणेशोत्सव प्रेक्षणीय होण्यासाठी धुरिणांच्या मार्गदर्शनाची गरज
खासगी संस्था, संघटनांनी प्रेक्षणीय सादरीकरणासाठी स्पर्धा घ्याव्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com