सभापतींच्या पत्राला केराची टोपली?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मंगळवार तळे रस्ता ठरतोय अपघातांना निमंत्रण; प्रशासन करतंय दुर्लक्ष

मंगळवार तळे रस्ता ठरतोय अपघातांना निमंत्रण; प्रशासन करतंय दुर्लक्ष

सातारा - शहराची ओळख असलेला राजवाडा परिसर अतिक्रमणांनी घेरला असून, चांदणी चौक ते मंगळवार तळे रस्त्याचा विक्रेते व वडाप वाहतूकदारांनी ताबा घेतला आहे. अभयसिंहराजे संकुलाचे पार्किंग वापराविना पडून असून, मूर्ती विक्रत्यांना स्टॉलसाठी ही आयती जागा खुणावत आहे. कुठेही उभ्या असलेल्या प्रवासी व भाजी विक्रेत्यांच्या रिक्षा, फळ विक्रेत्यांचे गाडे आणि त्यात कमी म्हणून की काय, आता काही भाजी विक्रेत्यांनी पथारी पसरल्या आहेत. या संदर्भात पालिकेच्या सभापतींनी कारवाईसाठी दिलेल्या निवेदनाला पालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. 

राजवाड्यापुढे पूर्वी रविवारचा बाजार भरवला जायचा. हा बाजार जाऊन मंडई आली. मात्र, आजही राजवाडा परिसराची बाजारासारखी अवस्था आहे.

कोणीही यावे आणि राजवाड्यापुढे मनाला वाट्टेल तेथे हातगाड्या, रिक्षा, स्टॉल उभे करून पथारी पसरून व्यवसाय करावा. त्याला कोणाचाही पायबंद नाही. त्यामुळेच कदाचित राजवाड्यापुढील (म्हणजे सध्या चौपाटी असलेल्या जागेवर) रविवारचा बाजार ३०-३५ वर्षांपूर्वी बंद झाला तरी मंडई आजही राजवाड्यापुढेच भरते. मोती चौकातील पदपथ सायंकाळी सहानंतर मंडईतील आवाजाने गजबजून गेलेला दिसतो. फळांच्या गाड्या आता पदपथावर भरणाऱ्या या नव्या मंडईला लागून उभ्या राहतात. वाहतूक पोलिसांची क्रेन केवळ वाहनांचे अडथळे उचलून नेते. त्यांना या गाड्या व पदपथावरील विक्रेते कधीही वाहतुकीत अडथळे वाटले नाहीत. हे कमी म्हणून की काय, एका झोपडपट्टीदादाने अजिंक्‍य गणेश मंदिरापुढे पालिकेवर दादागिरी करून स्टॉल उभे केले. नगरवाचनालयाच्या दारातही स्टॉल उभे राहिले. राजवाडा बस स्थानकाच्या कोपऱ्यावर सायंकाळनंतर उभ्या राहणाऱ्या भाजी विक्रेत्यांच्या रिक्षांची रांग कधीही शाहूपुरी पोलिसांच्या ‘क्रेन’ला दिसली नाही. ‘भोलाभुवन’च्या कोपऱ्यावर ग्राहकांची वाट बघत उभ्या राहणाऱ्या रिक्षा, त्याच्यापुढे ‘जीवन विकास’पासून मंडईपर्यंत उभ्या राहणाऱ्या वडापच्या जीप, समोरच्या बाजूला फळ विक्रेत्यांची लागणारी रांग हे सर्व नो हॉकर्स झोनमधील चित्र आहे. शाहू कलामंदिरकडे जाताना सायंकाळी ओढ्यावर, विठ्ठल मंदिरालगत भाजी विक्रेत्यांच्या रिक्षा उभ्या असतात. ‘शाहू कला’च्या कोपऱ्यावर फळ तसेच भाजी विक्रेते पथारी पसरून बसलेले असतात. 

गेल्या काही महिन्यांत या अतिक्रमणांनी राजवाडा व चांदणी चौक परिसर, तसेच मंगळवार तळे रस्ता व्यापून गेला आहे. भरचौकात, राजवाड्यासारख्या बाजारपेठेच्या केंद्रस्थानी हे चित्र असूनही पालिका प्रशासन तसेच शाहूपुरी पोलिस यांना यामध्ये काहीच गैर वाटत नाही. पालिकेचे आरोग्य समितीचे सभापती वसंत लेवे यांनी या अतिक्रमणांवर कारवाई संदर्भात पालिका प्रशासनाला पत्र दिले होते. त्याला अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला. अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनाने आपल्याच सभापतींच्या पत्राला केराची टोपली दाखवली की काय, अशी पालिका वर्तुळात चर्चा आहे. 

अभयसिंहराजे संकुल पार्किंगमध्ये स्टॉल नकोत
राजवाडा बस स्थानकासमोरील पालिकेच्या अभयसिंहराजे संकुलाच्या पार्किंगमधील जागा मूर्ती विक्रेत्यांना खुणावू लागली आहे. राजवाड्यापुढे पार्किंगचा प्रश्‍न बिकट असताना इमारतीच्या पार्किंग क्षेत्रात अशा पद्धतीने बेकायदेशीर स्टॉलला परवानगी दिली गेली तर नागरिकांमध्ये चुकीचा समज दृढ होईल व लोक पार्किंगचा वापर व्यापारी कारणांसाठी करू लागतील. त्यामुळे या संकुलाच्या पार्किंगमध्ये कोणत्याही स्टॉलला परवानगी देऊ नये, तसेच कोणी अतिक्रमण करत असल्याच त्यास प्रतिबंद करावा, अशी मागणी वसंत लेवे यांनी कालच मुख्याधाऱ्यांकडे केली आहे.