आता ‘घर टू घर’ कचरा गोळा होणार

आता ‘घर टू घर’ कचरा गोळा होणार

सातारा - सातारा शहरात रोज निर्माण होणारा ६७ ते ७० टन कचरा १०० टक्के उचलून, ओला- सुका वेगळा करून तो सोनगाव कचरा डेपोवर पोचवण्यासाठी पालिकेने नुकत्याच झालेल्या सभेत मक्तेदाराची नेमणूक केली आहे. या पोटी पालिकेच्या तिजोरीवर महिन्याला २३ लाख ६४ हजार रुपयांचा भार पडणार आहे. एवढा खर्च करून सातारा शहर कचरा व कुंडीमुक्त करण्याचे आव्हान पालिकेपुढे असणार आहे. 

तब्बल ३५ वर्षे हद्दवाढ रखडलेल्या सातारा शहरात (पालिका हद्द) ३७ हजार मिळकती आहेत. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या या शहरातील सोयी- सुविधांवर रोज सुमारे ६५ हजार चल लोकसंख्येचा भार पडतो. त्यामुळे शहरात प्रतिदिन ६७ ते ७० टन कचरा निर्माण होतो. हा कचरा उचलण्यासाठी पालिकेकडे ४१ घंटागाड्या आहेत. घरोघरी जाणाऱ्या या गाड्यांशिवाय शहरात २०० हून अधिक अधिकृत व अनधिकृत अशा कचरा कुंड्या व उघड्यावर कचरा फेकण्यात येणारी ठिकाणे आहेत. पालिकेच्या यंत्रणेमार्फत हा कचरा गोळा केला जातो. या सर्वांवर पालिका दरमहा २२ लाख ८० हजार रुपये खर्च करते. 

पालिकेमार्फत हे काम करण्यापेक्षा हे संपूर्ण काम एजन्सीमार्फत करण्याचा ठराव पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सभेत मंजूर करण्यात आला. पालिकेकडील उपलब्ध कागदपत्रांनुसार, नव्या करारानुसार मक्‍तेदार एजन्सीची यंत्रणा घरोघरी जाऊन कचरा गोळा करेल. हा कचरा घेताना तो ओला-सुका वेगवेगळा करण्यात येईल. रोज गोळा होणारा कचरा सोनगाव कचरा डेपोवर पोचविण्यात येईल. याशिवाय उघड्यावर पडणारा कचराही ओला- सुका असा विभागून तो उचलून डेपोत नेऊन टाकण्यात येणार आहे. मक्‍तेदाराच्या घंटागाड्या सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यरत ठेवण्याची अट मक्‍तेदारावर बंधनकारक असून, उघड्यावर पडलेला कचरा साठून राहिले, असे चित्र दुर्मिळ असेल, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. 

शहरात पडणारा सर्व कचरा गोळा करून नेण्याची व घर टू घर कचरा गोळा करण्याची जबाबदारी मक्‍तेदाराची असल्याने भविष्यात सातारा हे कचरा कुंडीमुक्त व कचरा मुक्त शहर असेल, असा पालिकेचे आरोग्य सभापती वसंत लेवे यांचा दावा आहे. ते म्हणतात, ‘‘शहरात सुमारे ३७ हजार मिळकती आहेत. घरटी, मासिक प्रत्येकी ६३ ते ६५ रुपये या दराने मक्‍तेदार काम करणार आहे. घंटागाडी आली नसल्याची तक्रार मिळाल्यास मासिक दराच्या दुप्पट म्हणजे १२५ ते १३० रुपये दंड आकारण्याची करारात तरतूद आहे. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी मक्‍तेदार सुनियोजित काम करेल. त्यामुळे लवकरच आपण १०० टक्के कचरामुक्त शहर या दिशेने वाटचाल करू.’’

कचरा, विल्हेवाट अन्‌ खर्च
साताऱ्यातील एकूण मिळकती  ३६,९६०
 कचऱ्यापोटी पालिकेचा सध्याचा खर्च   २२ लाख ८० हजार
 कचऱ्यापोटी मक्‍तेदाराला द्यायाची मासिक रक्कम   २३ लाख ६४ हजार
 मक्‍तेदाराच्या घंटागाड्या सायंकाळी पाचपर्यंत कार्यरत राहणार
 ओला व सुका कचरा वेगळा करण्याची जबाबदारी मक्‍तेदाराची 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com