महामार्ग दुपारनंतर जाम!

कऱ्हाड - कोल्हापूर नाक्‍यावर रविवारी लांबच लांब लागलेल्या रांगा.
कऱ्हाड - कोल्हापूर नाक्‍यावर रविवारी लांबच लांब लागलेल्या रांगा.

पुणे, मुंबई लेनमध्ये ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा; पर्यायी रस्त्याचाही वापर
सातारा - दिवाळीच्या सुट्या संपवून चाकरमानी कामाच्या ठिकाणी परतू लागल्याने आज दुपारनंतर महामार्ग जाम झाला. तासवडे व आनेवाडी येथील टोलनाक्‍यांसह ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवली होती. तरीही महामार्गावर धिम्या गतीने वाहने पुढे सरकत होती. वाहने वेडीवाकडी नेण्याचा प्रयत्न करताना आनेवाडी टोलनाक्‍यावर वाहन चालकांत बाचाबाचीही झाली.

दिवाळी सणासाठी कुटुंबीयांसह आठवड्यापूर्वी गावाकडे आलेले चाकरमानी दिवाळीची सुटी संपल्याने परतीच्या प्रवासाला लागले.
उद्यापासून कामावर हजर होण्यासाठी ते आजच मुंबई-पुण्याकडे रवाना होत होते. दुपारपासूनच महामार्गावर वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे महामार्गावर तीनही लेन "हाउसफुल्ल' होत्या. विशेषतः कोल्हापूरकडे जाणाऱ्या महामार्गावर तुरळक प्रमाणात वाहने धावत होती. कऱ्हाडहून पुणे, मुंबईला जाणाऱ्या तीनही लेनवर वाहनांच्या रांगा दिसत होत्या.

त्यामुळे महामार्ग वाहनांनी फुलून गेला होता. सायंकाळी कऱ्हाडमधून पुण्याकडे जाणारी वाहने आणि महामार्गावरून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्‍यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन ते तीन किलोमीटर रांगा लागल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. कोंडीतून मार्ग काढण्यासाठी चालक मिळेल त्या जागेतून वाहने पुढे नेत असल्याने ही कोंडी अधिकच गुंतागुंतीची होत होती. उड्डाण पुलांच्या ठिकाणी काही चालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर केल्यानेही वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक झाली.

तासवडे, आनेवाडी टोलनाक्‍यांवरही गर्दी
महामार्गावर कऱ्हाड ते पुणे दरम्यान सातारा जिल्ह्याच्या हद्दीत दोन टोलनाके आहेत. तासवडे व आनेवाडी येथील दोन्ही टोलनाक्‍यांवर
दोन ते तीन किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे टोलनाका पास करण्यासाठी किमान अर्ध्या तासाचा कालावधी जात होता. टोलनाका व्यवस्थापन जादा कर्मचाऱ्यांच्या मदतीने रांगा कमी करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, रस्त्यावर आलेल्या वाहनांची संख्या लक्षात घेता वाहनांच्या रांगा काही कमी होत नव्हत्या. आनेवाडी येथे दुचाकीस्वारांसाठी जागाच नसल्याने मिळेल त्या जागेतून दुचाकीस्वार पुढे जात होते. त्यातूनही कोंडीत भर पडत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com