गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट!

मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

सातारा - बेकायदा बंदूक बाळगणाऱ्यांवर पोलिसांचे नियंत्रण नसल्यामुळे शहरासह जिल्ह्यात अनेकांकडे अशा शस्त्रांचा सुळसुळाट झाला आहे. कोजागरीच्या रात्री शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर या मुद्‌द्‌याचे गांभीर्य वाढले आहे. पोलिस यंत्रणेला तातडीने ठोस मोहीम राबविणे आवश्‍यक  बनले आहे.

सातारा - बेकायदा बंदूक बाळगणाऱ्यांवर पोलिसांचे नियंत्रण नसल्यामुळे शहरासह जिल्ह्यात अनेकांकडे अशा शस्त्रांचा सुळसुळाट झाला आहे. कोजागरीच्या रात्री शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर या मुद्‌द्‌याचे गांभीर्य वाढले आहे. पोलिस यंत्रणेला तातडीने ठोस मोहीम राबविणे आवश्‍यक  बनले आहे.

बेकायदा शस्त्रांचा विषय जिल्ह्यात अनेकदा ऐरणीवर आला आहे. कऱ्हाड, फलटण, लोणंद या भागांत अनेकदा बेकायदा बंदुकीचा वापर करून गुन्हे झाल्याचे समोर आले. जिल्ह्यातील अनेक ‘दादा’ बंदूक बाळगून फिरतात, अशी चर्चा आहे. शहरातही बेकायदेशीर बंदुका, गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्याचे प्रमाण कमी नाही. किंबहुना बेकायदेशी बंदुकीच्या तस्करीमध्ये काही जण गुंतल्याची चर्चा आहे. त्यातून होणारी मोठी आर्थिक उलाढाल जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधित करण्यासाठी होत आहे. गोळीबाराच्या घटना झाल्यानंतर पोलिसांकडून बेकायदेशीर शस्त्र वापरण्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला जातो. मात्र, पुढची घटना घडेपर्यंत ठोस कारवाई होत नाही. कोजागरीच्या रात्रीही साताऱ्यात कधीही झाला नाही, असा राडा झाला. दोन्ही राजे गटाच्या कार्यकर्त्यांत झालेल्या या राड्याच्या वेळी गोळीबार झाला. याप्रकरणी गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र, अद्याप गोळी झाडली कुणी हे पोलिसांना समजलेले नाही. त्याचा तपास सुरू आहे.

या घटनेनंतर बेकायदेशीर शस्त्र बाळणाऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बेकायदेशीर बंदूक वापरण्याची भीती वाटण्याऐवजी अनेक जण गर्वाने त्या दाखवत बिनधास्तपणे फिरत असतात. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संबंधितांची जरब बसते. दहशतीचे वातावरण निर्माण होते. कोजागरीच्या दिवशीही गोळ्या झाडल्याने गांभीर्य वाढले आहे. सर्वसामान्य सातारकरांमध्ये दहशत माजली आहे. त्यामुळे त्या प्रकरणात बंदूक वापारण्याचा छडा पोलिसांनी कोणत्याही परिस्थिती लावणे आवश्‍यक आहे. केवळ त्याला ताब्यात न घेता बेकायदेशीर बंदुका पुरवणाऱ्या यंत्रणेपर्यंत पोचण्याची कामगिरी पोलिसांना बजवावी लागणार आहे.

याच प्रकरणातील नाही, तर शहरातही बेकायदा शस्त्र वापरण्यांची माहिती घेण्यासाठी पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कामाला लावणे आवश्‍यक आहे. त्यानंतर अशी शस्त्र बाळगणारे व त्याचा पुरवठा करणाऱ्यांवर ठोस कारवाई झाली पाहिजे. अन्यथा शहरातील वातावरण पाहता यापुढेही बेकायदेशीर शस्त्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शहराच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बाब शोभनीय नाही, याचा पोलिस दलाने गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे. नागरिकांनीही अशा प्रकारे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती पोलिसांना गोपनीय पद्धतीने देणे आवश्‍यक आहे.

बंदुकीचे युवकांमध्ये आकर्षण
बेकायदा शस्त्र बाळगणारे खुलेआम या शस्त्रांचे प्रदर्शन मांडत असतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या युवकांमध्येही अशा बेकायदेशीर शस्त्रांचे आकर्षण वाढत आहे. त्यातून अनेकांना बेकायदेशीर शस्त्राच्या तस्करीत वापरले जाण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यावर तातडीने कारवाई होणे आवश्‍यक आहे.