अचानक चक्कर येऊन पडतो काय अन् तो...

अभिजित उर्फ दत्ता शिवाजी माने
अभिजित उर्फ दत्ता शिवाजी माने

तारळे (ता. पाटण, जि. सातारा): साडे सहा फूट उंची, पिळदार स्नायू, धिप्पाड शरीरयष्टी, अवघे सहवीस वर्षे वय असणारा तरुण पळताना अचानक चक्कर येऊन पडतो काय अन तो आपल्यातून निघून जातो काय सारेच अविश्वसनीय. कोणाचाही विश्वास बसणार नाही अशी घटना काल घडली. अन् सर्वांना चटका लावून गेली.

अभिजित उर्फ दत्ता शिवाजी माने (रा. राहुडे ता. पाटण) येथील हा उंच व धिप्पाड बांध्याच्या युवक काल सकाळी नेहमीप्रमाणे पळायला गेला होता. गावापासून जवळच पालीजवलील पालफेर शिवारात पळताना चक्कर येऊन पडला. काही वेळातच तेथून जाणाऱ्या बसमधील राहुडयाचेच वाहक रायसिंग चव्हाण व विनायक चव्हाण यांनी त्यास पाहिले. गाडी थांबवून फोनाफोनी करून त्यास कृष्णा हॉस्पिटलला पाठविले. तिथे पोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले, अन् सर्वांना एकच धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच राहुडे, तारळे परिसरा सह कराड मध्येही हळहळ व्यक्त केली गेली.

राहुडे (ता. पाटण) येथे एका सामान्य कुटुंबात अभिजितचा जन्म झाला. शालेय शिक्षण तारळे, महाविद्यालयिन शिक्षण कराड तर एमबीए पुणे येथे पूर्ण केले. कष्टाळू अभिजीतने काम करीत स्वतः च्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच दांडपट्टा, भालाफेक, कबड्डी व शिवचरित्र व्याख्याने देण्याचा छंद त्याला होता. कराड येथील लिबर्टी मजदूर मंडळात त्याने कबड्डीला सुरुवात केली. त्याने त्याच्या खेळाने सर्वांना प्रभावित केले. अल्पावधीतच त्याने त्यात प्राविण्य मिळवत कॉलेज टीममधून अनेक पारितोषिके मिळविली. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत त्याने व्यवस्थापक व प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती. कोल्हापूर विभागीय भालाफेक स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांक पटकाविला होता.

खेळाबरोबरच शिवचरित्राचा अभ्यास करून व्याख्याने देण्यातही तरबेज होता. पुण्यात शनिवार वाड्यावर झालेल्या व्याख्यान स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. अनेक ठिकाणी शिवचरित्रावर व्याख्याने दिली होती. नुकताच प्रतापगडावर शिवप्रतापदीना निमित्त झालेल्या व्याख्यानात त्याने वाहवा मिळविली तर उपस्थित पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांच्या वक्तृत्व शैलीचे कौतुक करत विशेष सन्मान केला होता. सध्या तो पुण्यातील फायनान्स कंपनीत नोकरीला होता. तरी देखील त्याने खेळ व व्याखानाकडे दुर्लक्ष केले नाही. याशिवाय एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारीही करत होता.

नुकताच तो सुट्टीवर घरी आला होता. मात्र, काळाने आकस्मिक पणे त्याच्यावर घाला घातला. उंच, धिप्पाड व पिळदार शरीरयष्टीच्या अभिजीत वर असा प्रसंग ओढवला हेच कोणाला पटेना. घरात आई, वडील, चुलता, चुलती, आजोबा असा परिवार त्याच्यामागे आहे. यामुळे माने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला तर आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला अभिजितचे अचानकपणे जाण्याने कुटुंबाचा आधारवडच हरपला. तसेच समाज एका खेळाडू व हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला मुकला. अशा उत्तम व्यक्तिमत्त्व असलेल्या खेळाडूचा आकस्मिक शेवट अनेकांना धक्का देणारा ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com