कास स्वच्छता अभियानास उद्या प्रारंभ

कास स्वच्छता अभियानास उद्या प्रारंभ

सातारा - प्लॅस्टिक कचऱ्याच्या वेढ्यातून कासला सोडविण्यासाठी आणि स्वच्छ, निर्मळ कास ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘सकाळ’ने श्रमदानातून कास स्वच्छतेची हाक दिली आहे. येत्या रविवारी (ता. २१) सकाळी साडेसात वाजता कास बंगल्यापासून मोहिमेस प्रारंभ होणार आहे. 

सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेला कास तलाव प्रदूषित होण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होऊ पाहात आहे. यातून वेळीच सावध होण्यासाठी अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक, संस्थांनी ‘सकाळ’च्या सहकार्याने कास स्वच्छता अभियानाची आखणी केली. त्यानुसार, येत्या रविवारी अभियानास सुरवात होईल. 

‘सकाळ’ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांच्यासह ‘सकाळ’चे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक - निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, सातारा पालिकेच्या नगराध्यक्षा माधवी कदम, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब कुकडे, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, पालिकेचे आरोग्य सभापती यशोधन नारकर, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे, मेढ्याचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे आदी प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच साताऱ्यातील विविध पर्यावरणप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी-सदस्य प्रमुख उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने श्रमदानाच्या या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सहभागी व्यक्तींनी इकडे लक्ष द्यावे
पायात शक्‍यतो बूट व डोक्‍यावर टोपी असावी.
स्वत:साठी न्याहारी व पाण्याची बाटली सोबत आणावी.
मोबाईल, किल्ली, पैसे, गॉगल अशा वस्तू गहाळ होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. शक्‍यतो या वस्तू आणणे टाळावे.
अडगळीच्या जागी साप, विंचू, मधमाशी किंवा इतर कीटक असू शकतात; काळजी घ्या.  
प्लॅस्टिक व काचा, बाटल्या दिलेल्या पोत्यांमध्ये स्वतंत्र जमा करा. 
आवश्‍यकता असल्यास हातमोज्यांची व्यवस्था केली आहे. 

कासला ने-आण करण्यासाठी पोवई नाक्‍यावरून मोफत बस व्यवस्था आहे. 

सकाळी बरोबर साडेसहा वाजता ‘सकाळ’ कार्यालयापासून बस निघेल.

साडेसात वाजता कास बंगल्याजवळून कामास सुरवात होईल. 

साडेदहापर्यंत काम संपवून पुन्हा कास बंगल्याजवळ जमायचे आहे. 

आपला सहभाग या अभियानाचे समन्वयक, वरिष्ठ बातमीदार शैलेन्द्र पाटील  (९८८११३३०८५) यांच्याकडे नोंदवा. शंका/अडचण असल्यास संपर्क साधावा.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com