धोक्‍याची घंटा वाजवूनही दुर्लक्ष!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

धोक्‍याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष
दरम्यान, या पुलाबाबत ‘सकाळ’ने प्रथम १२ एप्रिल २०१६ व त्यानंतर दुसऱ्या वेळी पाच ऑगस्ट २०१६ रोजी वृत्त प्रसिद्ध करून धोक्‍याचा इशारा दिलेला होता. मात्र त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने कसलीच दखल घेतली नाही.

फलटण/सांगवी - सांगवीनजीक असलेल्या करंज ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने फलटण- बारामती मार्गावरील वाहतूक रात्री बराच काळ बंद झाली आहे. त्यात हानी, दुर्घटना झाली नाही. मात्र, बारामतीला नोकरी, शिक्षणासाठी जाणाऱ्यांची गैरसाय झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याबाबत ‘सकाळ’ने दोन वेळा छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध करून गंभीर धोक्‍याचा इशारा दिला होता. मात्र, त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याची बाब पूल वाहून गेल्यावर उघड झाली आहे.    

फलटण- बारामती या २९ किलोमीटर मार्गादरम्यान सांगवी व सोमंथळीमध्ये करंज ओढा वाहतो आहे. त्याच्यावर चौपदरीकरणाच्या निमित्ताने मोठ्या भक्‍कम पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, त्याला पर्याय म्हणून शेजारून कमी उंचीचा पूल व रस्ता काढून देण्यात आला होता. त्यातच बारामती- फलटण हा परिसर औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून विकसित होत असताना त्या मार्गावर जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. चौपदरीकरणाचे काम मात्र, सध्या काही प्रमाणात ठप्प झाल्याने सर्व वाहने ही पर्यायी मार्गाच्या पुलावरूनच जात होती. पाणी जाण्यासाठी असलेल्या पाइपसह पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे. हा मार्ग  किंवा पूल त्वरित दुरुस्त होणे गरजेचे असले, तरी तशी शक्‍यता फार कमी आहे. अशा स्थितीत फलटण- बारामती मार्गावरून होणारी वाहतूक अन्य लांबच्या मार्गावरून वळविण्यात आल्याने प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाया जाणार यात शंका नाही. तथापि तालुक्‍याच्या पूर्व भागातील गोखळी- मेखळी रस्त्यावरून काही प्रमाणात वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. 

सोमंथळीनजीकचा पूल रात्री साडेनऊ वाजता ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने वाहून गेला असला, तरी कोणत्याही प्रकरची दुर्घटना घडली नाही. पूल वाहून गेल्यानंतर तहसीलदार विजय पाटील, नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राजेंद्र शेळके व महसूल कर्मचाऱ्यांनी त्वरित त्याठिकाणी जाऊन घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले आणि मार्गावरील वाहतूक वरील दोन मार्गावरून वळवली.