आमदार पुत्राचे राजकीय "लॉंचिंग' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सातारा - कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांचा मुलगा तेजस शिंदे याला राजकारणात लॉंचिंग करण्याची तयारी सुरू केली आहे. कोरेगाव तालुक्‍यातील प्रत्येक कार्यक्रमात त्याची आवर्जून उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या "रेस'मध्ये आतल्या गोटातून त्याचे नाव शर्यतीत आहे. त्यामुळे कोरेगाव मतदारसंघासह जिल्ह्यात आमदार शिंदे यांच्या सुपुत्राच्या राजकारणातील "लॉंचिंग'कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सातारा - कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांचा मुलगा तेजस शिंदे याला राजकारणात लॉंचिंग करण्याची तयारी सुरू केली आहे. कोरेगाव तालुक्‍यातील प्रत्येक कार्यक्रमात त्याची आवर्जून उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या "रेस'मध्ये आतल्या गोटातून त्याचे नाव शर्यतीत आहे. त्यामुळे कोरेगाव मतदारसंघासह जिल्ह्यात आमदार शिंदे यांच्या सुपुत्राच्या राजकारणातील "लॉंचिंग'कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शशिकांत शिंदे हे कोरेगाव तालुक्‍याचे आमदार असून, राष्ट्रवादी कॉंगेसचे विधानसभेतील पक्षप्रतोद आहेत. सध्या ते मतदारसंघ आणि राज्यस्तरावरील राजकीय घडामोडींमध्ये जास्त व्यस्त असतात. त्यांना तेजस, साहिल अशी दोन मुले आहेत. दोघांचेही शिक्षण पूर्ण झाले असून, तेजसला त्यांनी व्यवसायात उतरविले आहे. आमदार शिंदे यांचे कोरेगाव, जावळीसह सातारा आणि मुंबईतही कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. तसेच माथाडी संघटनेतही ते पदाधिकारी असून, त्यांचे तेथेही कामगारांचे जाळे आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते जिल्हाध्यक्ष, आमदार, मंत्री, पक्षप्रतोद झाले आहेत. आगामी काळात प्रदेशाध्यक्षपदापर्यंत जाण्याची तयारी सुरू आहे. आगामी काळात "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडून त्यांना राज्यस्तरावर जबाबदारी दिली जाण्याची शक्‍यता आहे. हे सर्व ओळखून आपल्या मागे जिल्हा व कोरेगाव तालुक्‍यातील राजकारण आणि कार्यकर्त्यांचे व्याप सांभाळण्याची जबाबदारी कोणावर तरी द्यावी लागणार आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या ज्येष्ठ चिरंजीव तेजसला राजकारणात आणण्याची तयारी सुरू केली आहे. अलीकडच्या काही महिन्यांपासून आमदार शिंदे मतदारसंघातील दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत तेजसची उपस्थिती आवर्जून पाहायला मिळत आहे. तसेच गणेशोत्सवात विविध मंडळांना भेटी देणे, विविध ठिकाणी साहित्य वाटप कार्यक्रमात ते दिसत असून, कोरेगाव मतदारसंघात त्यांचा संपर्क वाढला आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया झाली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदाच्या "रेस'मध्ये वाईचे (कै.) माजी मंत्री मदनराव पिसाळ यांचे नातू विजयसिंह पिसाळ, आमदार शिंदे यांचे सुपुत्र तेजस शिंदे, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, सातारचे नगरविकास आघाडीचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे, युवकचे पदाधिकारी गजेंद्र मुसळे यांची नावे आहेत. विजयसिंह पिसाळ यांचे नाव अंतिम करण्याचा प्रयत्न सुरू होता. पण, तेजस शिंदे यांचे राजकारणात "लॉंचिंग' करण्यासाठी युवकचे जिल्हाध्यक्षपद योग्य असल्याचे लक्षात घेऊन आमदार शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार पिसाळ यांचे नाव मागे पडून तेजस शिंदे यांचे नाव पुढे आले आहे. 

मुळात युवकच्या जिल्हाध्यक्ष निवडीच्या मुलाखतीवेळी तेजस शिंदे यांचे नाव कुठेच नव्हते किंवा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाणूनबुजून त्यांचे नाव गुप्त ठेवले होते. आता अचानक तेजस शिंदेंचे नाव पुढे आल्याने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. काहीही असो आमदार शिंदेंनी आपल्या सुपुत्राचे राजकारणात लॉंचिंग करण्याची योग्य वेळ साधल्याचे चित्र आहे. आगामी काळात तेजस शिंदेंकडे आणखी कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आमदार शिंदे देणार, याकडे राष्ट्रवादीतील युवा कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.