दर गडगडल्याने डाळिंब उत्पादक रडकुंडीला

दर गडगडल्याने डाळिंब उत्पादक रडकुंडीला

बिजवडी - डाळिंब फळबाग लागवडीतून आर्थिक स्थैर्य मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यांना शासनाचे चुकीचे धोरण व नैसर्गिक आपत्तीमुळे वर्षानुवर्षे अपयश येत आहे. या प्रकारामुळे फळबाग लागवडधारक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकरी नशीब, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर चांगला माल आणेलही मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मालाला हमीभाव मिळत नाही. तो माल कवडीमोलाने विकावा लागत असल्याने शेतकरी अधिकाच आर्थिक कचाट्यात सापडत आहे. त्यामुळे डाळिंबाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांची आर्थिकमान उंचावण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

डाळींब लागवडीपासून ते बहार धरून फळतोडीपर्यंत लहान मुलांप्रमाणे त्या बागेची संगोपना केली जाते. लाखो रुपये खर्च करून कधी विविध रोगांमुळे, तर कधी दर गडगडल्याने फळे बांधावर अशीच फेकून द्यावी लागतात. त्यामुळे बहुतांश फळबाग लागवडधारकांनी डाळिंब काढून पेरू, आंबा, सीताफळाकडे लक्ष दिल्याचे दिसून येते. मात्र, अनेक ठिकाणी अजूनही डाळिंब लागवड केली जात आहे. डाळिंब बागायतदारांना दलालांमार्फत लुबाडण्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत. राज्य शासनाने बाजार समित्यांमधील दलाली संपवल्याचा कितीही दावा केला असला तरी शेतकऱ्यांच्या कष्टाच्या कमाईवर हात मारण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. एका रात्रीत कोट्यधीश करणारे पीक म्हणूनही डाळिंबाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊ लागली होती. मात्र, कष्टाने पिकविलेले फळ अक्षरश: दलालांच्या घशात घालावे लागत आहे. शेतकऱ्याने बाजार समितीच्या आवारात माल आणला, की दलाल चांगल्या गुणवत्तेच्या मालाच्या सहा प्रकारात वर्गवारी करतो. ही वर्गवारी शेतकऱ्यांच्या खर्चाने केली जाते. तत्पूर्वी दलाल ट्रान्स्पोर्टच्या वाहनांमधील कॅरेटमधून स्वत:च्या कॅरेटमध्ये माल उतरवून घेतो.  या उतरवणुकीचे भाडेही शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते, तसेच दलाल स्वत:च्या कॅरेटचे भाडेही शेतकऱ्यांकडून हमाली, तोलाई, भराईमध्ये ही रक्कम वसूल केली जाते.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात डाळिंबाचे बाजार ९५ रुपयांपर्यंत होते. मात्र, काही दिवसांतच डाळिंबाचे बाजार सरासरी १० ते २४ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. फळबागेची मुदत संपल्यानंतर बागेत फळे ठेवून फायदा होत नाही, तर ती गळून पडतात. त्यामुळे ठराविक मुदतीनंतर फळे तोडावीच लागतात. मात्र, दराच्या अशा उतरत्या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. परिणामी त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. साधारण एका एकर डाळिंब बागेसाठी एक लाखाच्या आसपास खर्च येतो. बाजारभावातील दर उतरण्याची अजब कारणे दलाल शेतकऱ्यांना देताना दिसून येत आहेत.

डाळिंबाची लागवड करून चार वर्षे झाली होती. प्रत्येक वेळी कळी निघण्याचे व्यवस्थापन नीट न झाल्याने एकही बहार हाताला आला नव्हता. मात्र, यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बहाराचे नियोजन केल्याने चांगली कळी लागून  बहार यशस्वी झाला होता. मात्र, पुन्हा दराने दगा दिल्याने दहा रुपयापासून चांगला माल ३५ रुपयांपर्यंत कसातरी घालावा लागला.
- गणेश शिंदे,  फळबाग लागवडधारक शेतकरी. 

डाळिंबाला हमीभावाची गरज
डाळिंब हे फळपीक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणारे आहे. योग्य व्यवस्थापन झाले, तर फळबाग यशस्वी होऊ शकते. फक्त या पिकाला हमीभाव मिळण्याची गरज आहे. शासनाने या मागणीचा विचार करावा, अशी मागणीही फळबाग लागवडधारक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com