निर्माल्य दान उपक्रमास भरभरून प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

सातारा व कऱ्हाडमध्ये ‘यिन’तर्फे उपक्रम; दहा ट्रॉली निर्माल्य झाले जमा, तनिष्कांचाही सहभाग 

सातारा व कऱ्हाडमध्ये ‘यिन’तर्फे उपक्रम; दहा ट्रॉली निर्माल्य झाले जमा, तनिष्कांचाही सहभाग 

सातारा - सकाळ वृत्तसमूहाच्या यंग इन्स्पिरेटर नेटवर्कच्या वतीने (यिन) गणेश विसर्जनानिमित्त सातारा व कऱ्हाड येथे ‘यिन’ स्वयंसेवकांनी राबविलेल्या निर्माल्य दान उपक्रमास नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. संगम माहुली येथे स्वयंसेवकांनी सुमारे आठ टॉली निर्माल्य जमा केले. गणेशमूर्तींबरोबर नागरिक निर्माल्यही मोठ्या प्रमाणावर नदीत विसर्जन करतात. त्यामुळे या दिवशी सर्वांत जास्त जलप्रदूषण होते. हे जलप्रदूषण टाळण्यासाठी ‘यिन’च्या वतीने दरवर्षी स्वयंसेवक निर्माल्य दान उपक्रम राबवितात. यावर्षी साताऱ्यात संगम माहुली येथे सकाळपासूनच स्वयंसेवक ‘कृष्णा’च्या पात्रानजीक ठिकठिकाणी उेभे राहून नागरिकांना निर्माल्य नदीत न टाकता त्यांच्याकडे देण्याचे आवाहन करत होते.

नागरिकही मुलांचा उपक्रम पाहून कौतुकाने त्यांच्याकडे निर्माल्य देत होते. या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सायंकाळपर्यंत फुलांचे हार, दुर्वा असे सुमारे आठ ट्रॉली निर्माल्य जमा झाले. साताऱ्यात १२० विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमास धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. दत्तात्रय चवरे, प्रा. विजय पाटील यांचे सहकार्य लाभले.

कऱ्हाडला दोन ट्रॉली निर्माल्य जमा

कऱ्हाड - दै. ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क व यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे येथे निर्माल्य दान उपक्रम राबवण्यात आला. ‘यिन’चे मुख्यमंत्री अनिकेत मोरे, शास्त्र महाविद्यालयाचे डॉ. बी. ई. महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा घाटावर हा उपक्रम झाला. सकाळी साडेआठपासून ‘यिन’चे प्रतिनिधी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी या उपक्रमात कार्यरत होते. त्यांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही मदत केली. या वेळी सुमारे दोन ट्रॉली निर्माल्य जमा झाले. काहींनी ‘यिन’ सदस्यांकडे मूर्तीही दान केल्या. निर्माल्य व मूर्ती पालिकेच्या ताब्यात देण्यात आल्या.