साक्षी जिंकली अन्‌ अख्खं गाव नाचलं...

साक्षी जिंकली अन्‌ अख्खं गाव नाचलं...

साताराः जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील तीन डोंगरांच्या पायथ्याशी वसलेले चाफळ हे छोटेसे गाव. मात्र, या गावात मंगळवारी (ता. 10) अक्षरशः सर्व ग्रामस्थांनी आठ दिवस आधी दिवाळी साजरी केली. त्याला कारणही तसेच होते. या गावातील साक्षी प्रमोद पाटील या समर्थ विद्यामंदिरातील 13 वर्षाच्या मुलीने कोल्हापूर विभागीय आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींत 38 किलो वजन गटात विजेतेपद मिळविले. आता ती राज्य स्पर्धा खेळणार आहे. चाफळ या छोट्या गावातील मुलीने मिळविलेले हे यश खरोखरच मोठे आहे. ना व्यवस्थीत तालीम ना कोणत्याही सुविधा. मॅटचा तर पत्ताच नाही. तरीही तीने मॅटवर खेळून विजेतेपद खेचून आणले. तिच्या यशाने आख्खे गाव भारवून गेले होते. विजेतेपद मिळवून काल ती गावात येताच गावकऱ्यांनी तीची घोड्यावरून बॅंजोच्या साथीत मिरवणूक काढली. फटाक्‍यांची आतषबाजी तर ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने एवढी केली की जणू दिवाळीच.

या मिरवणुकीत गावातील आबालवृद्ध सहभागी झाले होते. गावातील समस्त मुले नाचून आनंद व्यक्त करत होती. महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. चाफळमध्ये स्वयंस्फुर्तीने निघालेली ही पहिलीच मिरवणूक असावी. मधेच साक्षीला खांद्यावर घेऊन युवक, वस्ताद आणि छोटी शाळकरी मुलेही नाचत होते. मार्गावर महिला तीचे औक्षण करत होत्या. गावाच्या मध्यावर असलेला ग्रामपंचायतीच्या पारावर या मिरवणुकीचे सभेत रुपांतर झाले. सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीने हा सत्कार आयोजित केला. साक्षी तशी लहान चणीची. पारावर एकावर एक तीन - चार खुर्च्या ठेवून तीच्यासाठी गावकऱ्यांनी उंच व्यासपीठ केले आणि तिला हार, शाल घालून तीचे अभिनंदन करण्यासाठी रांग लागली. सरपंच अलका पाटील, उपसरपंच अंकुष जमदाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता वेल्हाळ यांनी तसेच इतरांनी तीचा सत्कार केला. पैलवान बापू साळुंखे, ल. सी. बाबर, संभाजीराव देशमुख, संतोष तिकुडे, उमेश पवार, मारुती साळुंखे, दिलीप साळुंखे अशा अनेकांनी भरभरून अभिनंदन केले.
प्राथमिक शिक्षक प्रशांत जाधव यांचा उर आणि उत्साह तर ओसंडून वहात होता. अशा भारावलेल्या वातावरणात तीचा ग्रामस्थांनी भव्य सत्कार केला. तीला मार्गदर्शन करणारे संजय पाटील, प्रदिप बाबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

जून्या पिढीतील पैलवान साक्षीचे आजोबा जगन्नाथ पाटील (माइनकर), आजी, आई, वडील प्रमोद, काका संजय, संपत शिंदे या सर्वांचे डोळे छोट्या नातीच्या भव्य सत्काराने आनंदाने पाणावले होते. सर्व जणांच्या नजरेत एकच भाव होता. ""साक्षी, तू राज्य स्पर्धेतही विजेतेपद मिळव आणि आम्हाला पुन्हा तुझी मिरवणूक काढून आभिमानाच्या, आनंदाच्या सागराची सफर घडव. गावाचे नाव उज्ज्वल कर.'' साक्षीच्या या यशाने भारावलेल्या समाजिक कार्यकर्ते सुर्यकांत पाटील यांनी यावेळी मुलींना मॅटवर सराव करता यावा यासाठी मॅट करीता 20 हजार रुपये तालमीसाठी धडपडणाऱ्या प्रदीप बाबर यांच्याकडे सुपुर्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com