मान्याचीवाडी शाळेत ऑनलाइन हजेरी! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

ढेबेवाडी - विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे वेगळी ओळख टिकवून असलेल्या आदर्शग्राम मान्याचीवाडी (ता. पाटण) येथील प्राथमिक शाळेत लोकसहभागातून बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. शिक्षक व विद्यार्थी त्यावर ऑनलाइन हजेरी नोंदवत आहेत. 

ढेबेवाडी - विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे वेगळी ओळख टिकवून असलेल्या आदर्शग्राम मान्याचीवाडी (ता. पाटण) येथील प्राथमिक शाळेत लोकसहभागातून बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. शिक्षक व विद्यार्थी त्यावर ऑनलाइन हजेरी नोंदवत आहेत. 

आयएसओ मानांकनप्राप्त मान्याचीवाडी शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. केंद्रप्रमुख सूर्यकांत पवार, मुख्याध्यापिका सुजाता भंडारे, उपशिक्षक आनंद गायकवाड, मीना गायकवाड, ऊर्मीला दोडमणी तिथे कार्यरत आहेत. फुलझाडांनी सुशोभित परिसर, विद्यार्थ्यांनी फुलविलेला मळा, मोठे मैदान, निसर्गरम्य वातावरण, डिजिटल क्‍लासरूम, ज्ञानरचनावादी गुणवत्तापूर्ण शिक्षण, विविध सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमांतून सहभाग आदी वैशिष्ट्यांनी समृध्द असलेल्या या शाळेचा आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरव झाला आहे. गावासह शाळेच्या परिसरावर सीसीटीव्हीचा वॉच आहे. शालेय उपक्रम आणि विकासामध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. शाळेत लोकसहभागातून बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी बैठकीत घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणीही केली. त्यासाठी सुमारे 15 हजार रुपये खर्च आला. माजी सभापती यू. टी. माने यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच रवींद्र माने, उपसरपंच अधिकराव माने, सदस्य पूनम माने, संगीता माने, लता आसळकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुवर्णा माने, ग्रामसेवक प्रसाद यादव आदींसह ग्रामस्थांनी ही संकल्पना पूर्णत्वाला नेण्यासाठी सहकार्य केले. विद्यार्थी व शिक्षकांमध्ये शिस्त वाढावी. शालेय वेळ आणि कामकाजाबद्दल त्यांच्यात जागरूकता यावी. टंगळमंगळ होवू नये या उद्देशाने बसविलेल्या या यंत्रणेमुळे अगोदरच शिस्तप्रिय असलेल्या मान्याचीवाडी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांत जागरूकता आणखी वाढली आहे. सकाळी शाळेत आल्याबरोबर आणि शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक या यंत्रणेवर ऑनलाइन हजेरी लावतात. त्याच्या प्रिंट काढून रेकॉर्ड ठेवले जाते. जिल्ह्यातील सर्व केंद्र शाळांमध्ये अशी यंत्रणा बसविण्याच्या आणि त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी अलीकडे जिल्हा परिषदेत हालचालीही सुरू आहेत. मात्र, निधीची वाट न पाहता मान्याचीवाडीकरांनी लोकसहभागातून शाळेत अशी सुविधा बसवून "आम्ही एक पाऊल पुढेच आहोत,' हेच पुन्हा एकदा सर्वांना दाखवून दिले आहे. 

Web Title: satara news school Online attendance