आनंदले... सरस्वतीचे प्रांगण...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

सातारा - ढोल-ताशांचा गजर, कौतुकाने दिलेले गुलाबपुष्प, आकर्षक रांगोळ्या, फुलबाजांची रोषणाई, नवे कपडे, प्रभातफेरी आणि बैलगाडीतून सवारी... सोबतीला रडारड, किलबिलाट अन्‌ जल्लोषही... अशा साऱ्या वातावरणात बालचमूंचे हसवे-रुसवे काढत काढत भरून गेलेले सरस्वतीचे प्रांगण आज पुन्हा महिनाभराच्या सुटीनंतर आनंदून गेले. पहिली घंटा झाली आणि जिल्ह्यातील शाळाही किलबिलल्या. 

दीर्घ उन्हाळी सुटीनंतर शाळेची घंटा आज पुन्हा वाजली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांत प्रवेशोत्सव साजरा झाला. ढोल-ताशांचा कडकडाट, फुलांच्या पायघड्या, आकर्षक रांगोळ्यांनी स्वागत झाले. फुलांची उधळण, हाती गुलाबाचे फूल देऊन विद्यार्थ्यांचे वाजतगाजत स्वागत झाले. सकाळी दहाच्या सुमारास सर्वच शाळांचे आवार पालक आणि विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून गेले. वर्ग कुठे आहे, हे पाहण्यासाठी पालकांची चढाओढ सुरू झाली. रिक्षावाला मामांमुळे त्यात आणखीनच भर पडली. त्यामुळे शाळेच्या बाहेर वाहनांच्या गर्दीतून वाट शोधणे मुश्‍किल झाले. 

आई-बाबांनी कडेवर घेऊन शाळेत दाखल करताच चिमुकल्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. ते पाहून शाळांचा आवार काही काळ हिरमुसला खरा; पण, पहिला दिवस असल्याने शाळा लवकर सुटणार असल्याचा धीर देत शिक्षकांनी मुलांना वर्गात बसविले. 

शाळेला जाण्याची सवय ज्यांच्या अंगवळणी पडली आहे, अशी मुले उत्साहात आज पायरी चढले. स्वागताची तयारी पाहून मुलेही भारावून गेली. पहिल्या दिवशी शाळा बुडवायची नाही, असा पालकांचा समज असल्याने मूल दोन तास का बसेना पण शाळेत पाठविण्याची तयारी केली. दुपारपर्यंत शाळांच्या आवारात चैतन्याचे वातावरण होते. ज्यांनी प्रवेश अर्ज नेला, त्यांनी तो आजच दाखल केला. 

नव्याची नवलाई तरी हवी आई... 
आई आणि बाबा एवढेच जग असलेल्या चिमुरड्यांनी गुरुवारी पहिल्यांदाच शाळेची पायरी ओलांडली. तीच मुळी भांबावलेल्या अवस्थेत. रोजचे मायेचे बोट सोडून नव्या जगात प्रवेश करताना त्यांनी चक्क रडारड सुरू केली. ‘नक्को ना जाऊस तू...’ अशी हाकही अनेकांनी आईला दिली. नवे दप्तर, वह्या-पुस्तके, खाऊचा डबा आणि नव्या मित्र-मैत्रिणी मिळूनही त्यांची आईची ओढ कमी झालीच नाही. नव्याची नवलाई असली तरी त्यांना आईच हवी होती. भेदरलेल्या मुलांचे रडगाणे ऐकून पालकही काही क्षण हळवे झाले...