राजांच्या हजेरीबाबत उत्सुकता! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

सातारा - टोलनाका धुमश्‍चक्री प्रकरणात दोन्ही राजांचे समर्थक परागंदा झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सत्काराचा कार्यक्रम जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. धुमश्‍चक्री प्रकरणातील गुन्ह्यात साताऱ्याचे खासदार व आमदारांचीही नावे असल्याने दोघांपुढेही कायद्याचे अडथळे उभे राहिले आहेत. म्हणूनच ते या जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहणार का, याची कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

सातारा - टोलनाका धुमश्‍चक्री प्रकरणात दोन्ही राजांचे समर्थक परागंदा झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सत्काराचा कार्यक्रम जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. धुमश्‍चक्री प्रकरणातील गुन्ह्यात साताऱ्याचे खासदार व आमदारांचीही नावे असल्याने दोघांपुढेही कायद्याचे अडथळे उभे राहिले आहेत. म्हणूनच ते या जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहणार का, याची कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

कोजागरीच्या रात्री टोलनाका प्रकरणावरून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांत धुमश्‍चक्री झाली होती. यानंतर पोलिसांनी खासदार, आमदारांसह त्यांच्या शंभर ते दोनशे समर्थकांवर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. त्या वेळेपासून अटक टाळण्यासाठी दोन्ही राजांचे समर्थक परागंदा झाले. जे सापडले त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी कारवाई सुरू ठेवली. काही समर्थक जिल्ह्याबाहेर पर्यटनासाठी गेले आहेत, तर काही अज्ञातवासात राहिले आहेत. आमदार समर्थकांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केले आहेत. न्यायालयाकडून अद्याप दिलासा न मिळाल्याने दोन्ही राजे व त्यांच्या कार्यकर्त्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. 

या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीस 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सातारा जिल्ह्याच्या वतीने 13 नोव्हेंबरला त्यांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वपक्षीय असणार आहे. त्यासाठी विविध समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. शरद पवार गौरव सर्वपक्षीय समितीत सर्व आजी, माजी आमदार व पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीची काल (शनिवारी) येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. त्या वेळी पोलिस अधीक्षक संदीप पाटीलही उपस्थित होते. बैठक निम्मी संपत आल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आले व बैठकीत सहभागी झाले. त्यानंतर थोड्या वेळातच बैठक संपली. 

13 नोव्हेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमाबाबत मात्र, जनतेला प्रश्‍न पडले आहेत. एकमेकांना भिडणारे खासदार व आमदार मतभेद बाजूला ठेवून पक्षाध्यक्षांसमोर एकाच व्यासपीठावर येणार का? आणि त्या वेळी पोलिस काय भूमिका घेणार, असे प्रश्‍न जनतेला पडले आहेत. खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उदयनराजेंना सुमारे तीन महिने जिल्ह्याबाहेर राहावे लागले होते. सध्याही ते बाहेर आहेत. मात्र, शिवेंद्रसिंहराजे कालच्या बैठकीलाही उपस्थित होते. या गुन्ह्यातून वगळण्यासाठी आमदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. जवळपास तीन गुन्ह्यांमध्ये खासदार, आमदार व त्यांचे समर्थक पोलिसांना हवे आहेत. मात्र, ते तपासी अधिकाऱ्यांना सापडत नाहीत. त्यामुळे पक्षाध्यक्षांच्या कार्यक्रमाला नेते व कार्यकर्ते हजेरी लावणार का आणि हजेरी लावली तर आपण काय भूमिका घ्यायची, असे प्रश्‍न पोलिसांना पडले आहेत. 

पोलिसांचे लक्ष आजच्या निर्णयाकडे 
खासदार समर्थकांच्या जामीन व आमदार समर्थकांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवर उद्या (सोमवारी) जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय निर्णय होणार, यावर पोलिसांची भिस्त असणार आहे. त्यामुळे जामीन अर्जांवर न्यायालय काय निर्णय देणार, याचीच उत्सुकता आहे. कार्यकर्त्यांबरोबरच पोलिसांचेही त्याकडे लक्ष आहे.