"इन कमिंग' बंद झाल्याने पवारांची आठवण

"इन कमिंग' बंद झाल्याने पवारांची आठवण

सातारा - लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यात. एकेक "इनकमिंग सोर्स' बंद व्हायला लागल्यामुळे काहींना पवारसाहेबांची आठवण व्हायला लागली आहे. सगळ्या घडामोडी वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचतात. त्यासाठी आम्ही काही वेगळं जाऊन सांगायची गरज नाही. खासदारांना टोलनाक्‍याचा एवढा पुळका का? बाकीच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करत टोलनाक्‍याचा अठ्ठास कशासाठी? टोलमध्ये झोल आहे हे जिल्ह्याला माहीत आहे, असा आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. लोकसभा निवडणुकीत शरद पवार सांगतील त्याचेच काम करू, असा टिपण्णीही त्यांनी केली.

"सुरुची बंगला' या निवासस्थानी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर थेट तोफ डागली. सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. विक्रम पवार, राष्ट्रवादी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष नासीर शेख उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'पवारसाहेबांच्या गाडीत आम्ही नेहमीच असतो. पवार साहेबांनी गाडीत घेतले म्हणजे आम्ही काही मोठा तीर मारला नाही. काही लोक अडचणी निर्माण व्हायला लागल्या, की साहेबांच्या गाडीत स्वत: जाऊन बसतात. एकेक "इनकमिंग सोर्स' बंद व्हायला लागल्यामुळे त्यांना पवारसाहेबांची आठवण व्हायला लागली आहे. कोण काम करत, कोण पक्षविरोधी भूमिका घेतं हे श्री. पवार यांना समजते; आम्ही जाऊन सांगण्याची गरज नाही.'' दोन वेळा पक्षाने व जनतेने तुम्हाला खासदार म्हणून निवडून दिले. जिल्ह्यातील किती प्रश्‍न मार्गी लावले? मेडिकल कॉलेजचे काय झाले? रेल्वे बुकिंग ऑफिस साताऱ्यात होणार होते? असे अनेक प्रश्‍न आहेत. त्यातले किती मार्गी लागले याचा लेखाजोखा खासदारांनी जनतेसमोर मांडावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शासनाने केलेल्या कर्जमाफीपासून जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित आहेत. जावळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील शिक्‍क्‍यांमुळे शेती कर्ज मिळत नाही. असे असंख्य प्रश्‍न प्रलंबित असताना खासदारांना हातून गेलेल्या टोलनाक्‍याचा प्रश्‍न महत्त्वाचा वाटत आहे, अशी टीका करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'स्वत: अडचणीत आले, की आमच्याकडे बोट करायचे; पण तुम्ही केलेले उद्योग दुसऱ्याकडे बोट दाखवून लपत नाहीत. आपण गुण उधळतो, पराक्रम करतो, त्याची फळे भोगायची तयारी ठेवली पाहिजे. सारखं- सारखं एकच सांगून लोकांची सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न आता त्यांनी बंद करावेत.

पालिका निवडणुकीत गाफील राहिल्याने फटका बसला; पण खचून न जाता आम्ही जोमाने कामाला लागलो. आम्ही सुसाट न पळता कासवगतीने कामे करीत आहोत. सातारा विकास आघाडीची गाडी सुसाट आहे. गाडी कितीही सुसाट गेली तरी शेवट शरद पवारांजवळच जाऊन थांबली आहे.'' खासदार सारखं समोरासमोर येऊन बोलण्याचे आव्हान देतात. पालिका निवडणुकीनंतर चार वेळा आम्ही समोरासमोर आलो. त्या वेळी का बोलला नाहीत. मध्यंतरी पालिकेसमोर रोड शो सुरूच असताना माझ्यासोबत तीनच कार्यकर्ते होते.

त्यांच्यासोबत अख्खा लवाजमा होता. त्याही वेळी समोरासमोर का बोलला नाहीत? त्यांची गाडीसारखी "तंद्रीत'च असते. त्यामुळे त्यांना कोण आले आणि गेल हे सुद्धा कळत नाही. माझी गाडी कुठल्याही दुभाजकाला किंवा राष्ट्रवादी कार्यालयाजवळच्या खड्यात गेली नाही. माझी गाडी ही जमिनीवरच असते,'' असा चिमटाही शिवेंद्रसिंहराजे यांनी काढला. राजमातांनी वारंवार पालिकेत न जाता सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगराध्यक्षांना स्वतंत्रपणे काम करू द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले...
- लोकसभा निवडणुकीमुळे त्यांना पवार साहेबांच्या "गुड बुक्‍स'मध्ये राहावंस वाटतं
- त्यामुळे पुण्यापासून ड्रायव्हरशेजारी का होईना मला बसवून न्या, अशी त्यांची भूमिका असावी
- ढिसाळ कारभार असलेल्या व्यवस्थापनाकडे टोल नाका राहिलाच पाहिजे, हा अट्टाहास का?
- जिल्ह्यात जे मंजूर होईल ते माझ्यामुळे आणि जे होणार नाही, ते बाकीच्यांचे अपयश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com