झोपडपट्टीदादाच्या ‘स्टॉल’ला कोणाचा टेकू?

शैलेंद्र पाटील
शनिवार, 29 जुलै 2017

सातारा -  खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, हाणामाऱ्या अशा किमान डझनभर गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला एक झोपडपट्टीदादा भररस्त्यात ‘स्टॉल’साठी मांडव टाकतो काय; त्याची दखल ना वाहतूक पोलिसांना घ्यावीशी वाटते, ना नगरपालिकेला! कोणीही उठावे आणि मनाला येईल तसे वागावे, अशीच काहीशी परिस्थिती सातारकर अनुभवताहेत. त्यामुळेच की काय राजवाड्यापुढील बेकायदा स्टॉल उचलून नेण्याचे धाडस पालिका प्रशासन दाखवेना. उलट हे स्टॉल अधिकृत करून घेण्याचा खटाटोप पालिकेत सुरू झाला आहे. 

सातारा -  खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, हाणामाऱ्या अशा किमान डझनभर गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला एक झोपडपट्टीदादा भररस्त्यात ‘स्टॉल’साठी मांडव टाकतो काय; त्याची दखल ना वाहतूक पोलिसांना घ्यावीशी वाटते, ना नगरपालिकेला! कोणीही उठावे आणि मनाला येईल तसे वागावे, अशीच काहीशी परिस्थिती सातारकर अनुभवताहेत. त्यामुळेच की काय राजवाड्यापुढील बेकायदा स्टॉल उचलून नेण्याचे धाडस पालिका प्रशासन दाखवेना. उलट हे स्टॉल अधिकृत करून घेण्याचा खटाटोप पालिकेत सुरू झाला आहे. 

सणवार कोणताही असो स्टॉलसाठी भररस्त्यात मांडव घालण्याची साताऱ्यातील व्यापारी पद्धत जुनी आहे. स्वत:च्या मालकीचे दुकान असताना त्याच्याबाहेर मांडव घालून, शेगडी व इतर विक्री साहित्य ठेवून सण ‘कॅश’ करण्याची व्यापारी वृत्ती बोकाळली आहे. कायदेशीर व्यवसाय करायला कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. मात्र, हे करताना रस्त्यात दुकान मांडून रहदारीचा खोळंबा केला जातो. एखाद्या बॅनरखाली संघटित होण्याचे लाभ लक्षात आल्याने सर्वांच्या संघटना निघाल्यात; रस्त्यावरून चालणारा सामान्य माणूस किंवा वाहनचालक यांची कोणतीच संघटना आजपर्यंत ऐकिवात नाही. परिणामी अशी अतिक्रमणे करणाऱ्यांचे फावले आहे. 

राजवाड्यासमोर, अजिंक्‍य गणपती मंदिरासमोर गेल्या आठवड्यात एक मंडप उभारला गेला. रहदारीला अडथळा ठरणारा हा मंडप कोणाचा, त्याला रस्त्यात परवानगी कोणी दिली, याबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा होती. पोलिसांच्या यादीवरील एका झोपडपट्टीदादाने राखी स्टॉलसाठी हा मांडव उभारल्याचे समजले. या दादाने दस्तुरखुद्द नगराध्यक्षांना खंडणी मागितल्याचा गुन्हा दोन वर्षांपूर्वी त्याच्या नावावर नोंद आहे. विशिष्ट भागात गर्दी-मारामारी हा त्याचा नित्याचा खेळ आहे. आत्तापर्यंत त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, जीवे मारण्याची धमकी देणे, सरकारी कामात अडथळा असे गुन्हे नोंद आहेत. चार जिल्ह्यांतून त्याला अनेकदा तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तरीही तो साताऱ्यात असतो. तडीपारीच्या आदेशाचा भंग केलेल्या प्रकाराची गणतीच नाही. तडीपारीनंतरही त्याचा बोगदा परिसरात वावर असे. पोलिसांत त्याच्या विरोधात तक्रार द्यायचे सोडाच, तो दिसल्याची माहिती देण्यासही लोक पुढे येत नाहीत. अर्थात पोलिसांना हे माहीत नाही, असे नाही. 

गेल्या शुक्रवारपासून राजवाड्यापुढे हे स्टॉल उभे आहेत. आता त्याठिकाणी लोकांनी व्यवसाय सुरू केलेला आहे. झोपडपट्टीदादा कधीपासून कामधंदा करून खाऊ लागला, असा प्रश्‍न सातारकरांना पडला आहे. सार्वजनिक जागा बळकावायच्या व छोट्या व्यावसायिकांना अव्वाच्या सव्वा भाड्याने देऊन त्यातून दलाली मिळवायची, असा हा धंदा आहे. दैनिक ‘सकाळ’मध्ये या अतिक्रमणाबाबत गेल्या सोमवारी एक छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. मात्र, या स्टॉलवर कारवाईचे सोडूनच द्या; भाडे घेऊन त्यांनाच अधिकृत मान्यता देण्याचे खटाटोप पालिकेत सुरू झाले आहेत. 

गुन्हेगारीला राजकीय पाठबळ?
पालिका प्रशासनाला त्या स्टॉलला हात लावण्याचे धारिष्ट होईना, त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना खालच्या पातळीवर राजकीय पाठबळ मिळतंय काय, असा प्रश्‍न लोकांना पडला आहे. शाहूपुरी पोलिसांच्या हद्दीत राजवाडा भाग येतो. किमान पक्षी सार्वजनिक वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी मुंबई पोलिस कायद्याखाली करवाई करण्याचे धारिष्ट वाहतूक पोलिस दाखवणार का, असे सातारकर विचारू लागले आहेत.