उसाच्या दुसऱ्या हप्त्याचा आकडा फुटेना

विकास जाधव 
गुरुवार, 20 जुलै 2017

काशीळ - जिल्ह्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामात गाळप केलेल्या उसाला ४३० रुपये प्रति टनाप्रमाणे दुसरा हप्ता देत दुसऱ्या हप्तातील कोंडी फोडली. त्यामुळे जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी दुसरा हप्ता किती, कधी व एकरकमी देणार का, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

काशीळ - जिल्ह्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामात गाळप केलेल्या उसाला ४३० रुपये प्रति टनाप्रमाणे दुसरा हप्ता देत दुसऱ्या हप्तातील कोंडी फोडली. त्यामुळे जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी दुसरा हप्ता किती, कधी व एकरकमी देणार का, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

जिल्ह्यात २०१६-१७ मधील गळीत हंगामात १५ साखर कारखान्यांनी ५४ लाख ३१ हजार १५७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ६५ लाख १६ हजार १८६ क्विंटल साखरेची निर्मिती केली. सर्वच कारखान्यांनी एफआरपीनुसार पहिला हप्ता देण्यात आला होता. काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त दर दिला. त्यानंतर साखरेच्या किंमतीत चांगली दरवाढ होऊन क्विंटलला तीन हजार ९०० ते चार हजार रुपयांच्या दरम्यान साखरेचे दर गेले होते. त्यामुळे साहजिकच उसाला दुसरा हप्ता जास्त मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली होती. या दरम्यानच ‘सह्याद्री’ कारखान्याने दुसऱ्या हप्त्याची कोंडी फोडत ४३० रुपये प्रतिटन असा विक्रमी हप्ता जाहीर करत कोंडी फोडली. ‘सह्याद्री’ने इतर कारखान्यांच्या तुलनेत कमीत कमी ३०० ते जास्तीत जास्त ५०० रुपयांचा फरक ठेवला आहे. त्यानंतर कृष्णा कारखान्यानेही दुसरा हप्ता ३०० रुपयांप्रमाणे जाहीर करून प्रति टनास तीन हजार १०० रुपये दर दिला आहे. मात्र, या कारखान्याने दुसऱ्या हप्ताची रक्कम देण्याचे दोन टप्पे केले आहेत. फलटण तालुक्‍यातील शरयू आणि लोकनेते हिंदूराव नाईक-निंबाळकर या कारखान्यांनी बेंदराच्या सणास टनास ५० रुपयांप्रमाणे हप्ता जमा केला आहे. हे अपवाद वगळता इतर कारखान्यांकडून अजून दुसरा हप्ता जाहीर करण्यात आलेला नाही. खरिपाच्या तोंडावर भांडवलाच्या दृष्टीने दुसरा हप्ता मिळेल, असा अंदाज शेतकऱ्यांनी बांधला असतानाच कारखान्यांकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. शेतकऱ्यांना दुसरा हप्ता किती, कधी व एकरकमी की विभाजन करून देणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.  

तीन हजारांचा आकडा कोण गाठणार?
सध्या साखर कारखान्यांना साखर विक्रीतून प्रति क्विंटलला तीन हजार ७०० ते तीन हजार ८०० रुपये मिळतात. गाळपास सुरवात करताना अनेक कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून सर्वांपेक्षा जास्त किंवा बरोबरीने दर देण्याचे आश्‍वासन दिले होते. सह्याद्री कारखान्याने दुसरा हप्ता सर्वाधिक दिला आहे. त्यापाठोपाठ ‘कृष्णा’ने दुसऱ्या बिल दोन टप्प्यात देण्याचे जाहीर करत ‘सह्याद्री’ची बरोबरी केली आहे. खरीप हंगामाच्या भांडवलाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. मात्र, इतर कारखान्यांकडून अजूनही दर जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. उर्वरित कारखाने प्रति टनास तीन हजारांचा हप्ता गाठणार का? याबाबत शेतकऱ्यांच्यात उत्सुकता लागून राहिली आहे.

टॅग्स