टॉयलेट आता एक 'सार्वजनिक' कथा

विशाल पाटील
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

  • पेट्रोलपंपांवरील शौचालये सर्वांसाठी
  • सातारा  जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात पेट्रोलपंपांवरील शौचालयांची तपासणी

सातारा : स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी पेयजल व स्वच्छता मंत्रालयाबरोबर पेट्रोलियम मंत्रालयही सरसावले आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवरील शौचालयांची तपासणी केली. या वेळी ही स्वच्छता सदैव स्वच्छ ठेवून ती प्रशासनालाही उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या. त्यामुळे पेट्रोलपंपांवरील शौचालये आता 'सार्वजनिक' वापरासाठीही उपलब्ध असतील. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपांवर शौचालये आहेत का? ती सुस्थितीत, स्वच्छ आहेत का? स्वच्छता कर्मचारी नेमले आहेत का? स्वच्छतागृहासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे का? हात धुण्यासाठी वॉश बेसिन, साबणाची सोय आहे का? शौचालय, स्वच्छताग्रहासाठी शोषखड्डे काढले आहेत का? याची जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नुकतीच तपासणी केली. या तपासणीत सर्व शौचालये स्वच्छ व सुस्थितीत असल्याचे जगताप यांनी सांगितले. 

सर्व नागरिकांना 'राइट टू पी'चा अधिकार असून, त्यासाठी शौचास व मूत्र विसर्जनासाठी सुरक्षित जागा असणे आवश्‍यक आहे. पेट्रोलपंपांवर ग्राहकांसाठी शौचालयांचा वापर केला जात असतो. आता सर्व प्रवाशांना शौचालयाचा वापर करता येईल. मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांच्या सूचनेनुसार पेट्रोलपंप व्यवस्थापक, चालकांना सूचना दिल्या असल्याचे जगताप यांनी सांगितले. 
पेट्रोलपंप मालकांनी शौचालये सुव्यवस्थित ठेवून ग्राहक, प्रवाशांना विनामूल्य उपलब्ध करून द्यावीत आणि स्वच्छ भारत अभियानात मोलाचा सहभाग नोंदवावा, असे आवाहनही कैलास शिंदे यांनी केले आहे. 

थेट शौचालयांना भेट 
तपासणीसाठी आलो आहे, असे सांगितले तर शौचालयांची दारे लगेच उघडली जातील. तसे न करता सर्वसामान्य लोकांनाही शौचालयांचा वापर करून दिला जात आहे का, याची तपासणी करण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाचे कर्मचारी दुचाकीवरून उतरून थेट शौचालयांत जात होते. यावेळी कोणी अडवले नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: satara news swachh bharat