भाज्यांचे दर कडाडले!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

सातारा - दिवाळी संपताच भाज्यांचे दर कडाडले असून, टोमॅटो अन्‌ काकडी वगळता ८० ते १२० रुपये किलोच्या आत कोणतीच भाजी मिळेनाशी झाली आहे. मेथीची पेंडी २० रुपयांना, तर इतर भाज्या तर मंडईतून गायबच झाल्या आहेत. कोथिंबिरीच्या पाच ते सहा काड्यांसाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत. सध्या मंडईची पिशवी भाज्यांनी भरण्यासाठी खिसा बऱ्यापैकी खाली करावा लागत आहे. तुलनेत नव्या कडधान्याचे दर कमी झाले आहेत. 

नागरिक दिवाळीच्या आनंदातून बाहेर पडायच्या आत भाज्यांनी झटका दिला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील आठवडे बाजारही तेजीत चालले आहेत. यावर्षी पाऊस चांगला झाला. मात्र, दिवाळीपूर्वी सुमारे तीन आठवडे परतीच्या पावसाने विविध भागांना सतत झोडपून काढले. त्यामुळे भाज्यांच्या उत्पादनांवर मोठा परिणाम झाल्याची माहिती भाजी उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. साहजिकच बाजार समितीतील भाज्यांची आवक कमी झाली अन्‌ दर अवाच्यासव्वा वाढले आहेत. सध्या मंडईत वांगी, पावटा, गवारीचा दर १२० रुपये सांगितला जात असून, नागरिक नाईलाजाने आवश्‍यक तेवढी भाजी घेत आहेत. दोडका, वांगी अन्‌ भेंडी कुठे ६० रुपये, तर कुठे ८० रुपये किलोने विकले जात आहेत. कोबी अन्‌ फ्लॉवरही भाव खाऊ लागला आहे.

पालेभाज्या मंडईत अभावानेच आढळत आहेत. झोडपणाऱ्या पावसाचा या भाज्यांवर मोठा परिणाम झाला असून, मेथी वगळता मंडईत चाकवत, चंदनबटवा, तांदळी अशा भाज्या फारशा आढळत नाहीत. कोथिंबिरीची पाच ते सहा काड्यांची दुसऱ्या दर्जाची पेंडी दहा रुपयांना घ्यावी लागत आहे. मात्र, रब्बीच्या पेरण्या होताच काही दिवसांतच कोथिंबीर मोठ्या प्रमाणावर बाजारात येते. त्यामुळे दर फार दिवस टिकून राहणार नसल्याचे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच पाऊस चांगला उघडला आहे. सध्या वातावरणही भाज्यांना पोषक आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत भाज्यांची जास्त आवक होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र, सध्या मंडईची पिशवी भाज्यांनी भरण्यासाठी खिसा बऱ्यापैकी खाली करावा लागत आहे. 

गरजेपुरतीच भाजी खरेदी
भाज्यांचे दर जास्तच वाढल्याने ग्राहक गरजेपुरती भाजी घेत असून, मालाला फारसा उठाव नसल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. खरिपातील मूग, मटकी, चवळीची काढणी झाली आहे. खटाव-माण तालुक्‍यांत त्याचे उत्पादनही चांगले झाले आहे. सध्या त्याचे किरकोळ विक्रीचे दर ५० ते ६० रुपये किलोच्या आसपास आहेत. भाज्यांच्या दरवाढीने अनेक नागरिकांच्या आहारात त्याचा समावेश वाढला आहे.