साताऱ्यात होणार पाण्याचे ऑडिट!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

सातारा - पाणी उपसा व वितरणातील तफावत शोधून काढणे, पाण्याची नासाडी-गळती शोधणे, पाणी वितरणातील त्रुटी शोधून सर्व नागरिकांना समान पाणी वितरण करणे, आता शक्‍य होणार आहे. त्यासाठी पालिकेला पाण्याचे लेखापरीक्षण करून घ्यावे लागणार आहे. सुधारित पाणीपुरवठा योजनेत झालेले घोळ निस्तरण्यासाठी हे लेखापरीक्षण आवश्‍यक असून त्यासाठी २० लाख रुपये मोजावे लागतील. 

सातारा - पाणी उपसा व वितरणातील तफावत शोधून काढणे, पाण्याची नासाडी-गळती शोधणे, पाणी वितरणातील त्रुटी शोधून सर्व नागरिकांना समान पाणी वितरण करणे, आता शक्‍य होणार आहे. त्यासाठी पालिकेला पाण्याचे लेखापरीक्षण करून घ्यावे लागणार आहे. सुधारित पाणीपुरवठा योजनेत झालेले घोळ निस्तरण्यासाठी हे लेखापरीक्षण आवश्‍यक असून त्यासाठी २० लाख रुपये मोजावे लागतील. 

सातारा नगरपालिकेच्या काल (ता. २०) झालेल्या सर्वसाधारण सभेत पालिकेच्या पाण्याचे लेखापरीक्षण करून घेण्याचा ठराव मंजूर झाला. ‘युआयडीएसएसएमटी’ योजनेंतर्गत शहरासाठी सुमारे ६० कोटी रुपये खर्चाची सुधारित पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. पाच वर्षे उलटूनही अद्यापही योजना अपुरी आहे. बोगदा ते चार भिंती दरम्यान, डोंगरी भागात (माची) सुमारे चार किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्थेची जलवाहिनी टाकून नागरिकांना नळ कनेक्‍शन देणे बाकी आहेत. कोटेश्‍वर माध्यमातून प्रतापगंज पेठ, शुक्रवार पेठ, गडकर आळी, बुधवार पेठेच्या काही भागास अद्याप निळ्या पाइपचे पाणी मिळालेले नाही. सुधारित पाणीपुरवठा योजना अद्याप अपुरी आहे. जीवन प्राधिकरणाचा ठेकेदार उर्वरित कामे कधी करणार, हे निश्‍चित नाही. अशा परिस्थितीत ठेकेदाराने झालेल्या कामात तांत्रिक गोंधळ घालून ठेवले आहेत. काही ठिकाणी मनमानी पद्धतीने कनेक्‍शन देण्यात आली आहेत.  परिणामी नागरिकांनी नव्या योजनेतूनही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. गळती व नासाडीतून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. काही भागात ठराविक जलवाहिन्यांवरील कनेक्‍शनना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाहीत. 

सुमारे अर्धा अब्ज रुपये खर्च होऊनही सातारकरांच्या वाट्याला पाण्याअभावी भोग आले आहेत. या योजनेतील तांत्रिक त्रुटी शोधण्यासाठी पालिकेला पाण्याचे लेखापरीक्षण करून घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तसा ठराव सभेने मंजूर केला आहे. या लेखापरीक्षणामध्ये नव्या योजनेचे पूर्ण सर्वेक्षण होईल. हे करताना अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. त्यात आढळणाऱ्या त्रुटी दूर झाल्यानंतर नागरिकांना पुरेशा दाबाने व पाण्याचे समान वाटप होईल.

आकडे बोलतात...
 ६७ टक्के - पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून लोकसंख्या
 ९७.५० लिटर - पालिका ग्राहकांना प्रतिदिनी दरडोई मिळणारे पाणी
 २१,७५९ - प्राधिकरणाचे पाणी पिणारे पालिका हद्दीतील लोक
 ६५,२३२ - कास व शहापूर योजनेवर अवलंबून असलेले सातारकर
 ६२० - विहिरीचे पाणी पिणारे लोक
 ८,५०० - बोअरचे पाणी पिणारे लोक
(आधार : नगरपालिकेचा २०१०-११ मधील पाणी लेखापरीक्षण अहवाल)

टॅग्स