अतिवृष्टीच्या जावळीमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

सायगाव - जावळी हा अतिवृष्टीचा तालुका म्हणून ओळखला जातो. जून महिना संपत आला तरी मॉन्सूनने चांगलीच हुलकावणी दिल्याने आतापर्यंत तालुक्‍यात केवळ 68 मिलिमीटरच पावसाची नोंद झाली आहे. हा मॉन्सून लांबल्यामुळे आजही जावळीत 17 गावे, सहा वाड्या- वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

मॉन्सूनचा पाऊस सुरू न झाल्यामुळे शेतकरी हा चिंताग्रस्त झालेला पाहायला मिळत आहे. पेरणीपूर्व मशागतदेखील करण्यासारखी परिस्थिती जावळीत नसल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तालुक्‍यात आजही पावसाने ओढ दिल्याने, पाऊस लांबल्यामुळे 17 गावांना, सहा वाड्या-वस्त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात थोडा फार पाऊस पडल्याने या भागातील केळघर, भुतेघर, बोंडारवाडी, खिलारमुरा, वारनेवस्ती, गवडी, डांगरेघर या गावांचे जलस्रोत उपलब्धतेमुळे टॅंकर बंद करण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला आहे. 

जिल्ह्यात अतिवृष्टीचा तालुका म्हणून जावळी तालुक्‍याची ओळख आहे. मात्र, यावर्षी अतिवृष्टीच्या जावळीतही गतवर्षीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे व मॉन्सूननेही हुलकावणी दिल्यामुळे अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तालुक्‍यात पश्‍चिमेकडील भागातही पाऊस नसल्याने आतापर्यंत 68 मिलिमीटर एवढ्याच पावसाची नोंद झाली आहे. 

मॉन्सून पाऊस अजूनही सुरू नसल्यामुळे आठवडाभरात सरासरी केवळ 30 ते 32 मिलिमीटर एवढीच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आजही तालुक्‍यातील काही गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे. 
- रोहिणी आखाडे-फडतरे, तहसीलदार, जावळी