अध्यक्षपद फलटण की जावळीला?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

निवडणुकीचा धुरळा खाली बसताच सुरू झाली सर्व तालुक्‍यांतून नावांची चर्चा 
सातारा - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या सिंहासनावर फलटणकर की जावळीतील शिलेदार विराजमान होणार याचीच चर्चा निवडणुकीचा धुरळा खाली बसताच होऊ लागली आहे. सध्यातरी संजीवराजे नाईक- निंबाळकर आणि वसंतराव मानकुमरे यांचीच नावे प्राधान्याने चर्चिली जात आहेत. 

निवडणुकीचा धुरळा खाली बसताच सुरू झाली सर्व तालुक्‍यांतून नावांची चर्चा 
सातारा - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या सिंहासनावर फलटणकर की जावळीतील शिलेदार विराजमान होणार याचीच चर्चा निवडणुकीचा धुरळा खाली बसताच होऊ लागली आहे. सध्यातरी संजीवराजे नाईक- निंबाळकर आणि वसंतराव मानकुमरे यांचीच नावे प्राधान्याने चर्चिली जात आहेत. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदी गेली काही वर्षे आरक्षणामुळे सातत्याने महिलांना संधी मिळाली. या वेळी अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले राहिले आहे. सहाजिकच अध्यक्षपद भूषविण्याच्या अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. या अध्यक्षपदावर डोळा ठेऊन खुल्या गटात इच्छुकांची संख्या वाढली; पण यातील शिरवळमधून माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे- पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे हे कुडाळमधून पराभूत झाले. त्यामुळे आता तरडगावातून निवडून आलेले संजीवराजे नाईक- निंबाळकर, म्हसवेमधून निवडून आलेले वसंतराव मानकुमरे, मानसिंगराव जगदाळे (मसूर), धैर्यशील अनपट (हिंगणगाव), मनोज पवार (खेड बुद्रुक), राजेश पवार (म्हावशी), मंगेश धुमाळ (पिंपोडे गट) हे या रेसमध्ये असतील. यापैकी अनुभवी आणि जिल्हा परिषदेचा गाडा यशस्वीपणे चालवू शकणाऱ्या तिघांचीच नावे पुढे येते आहेत. त्यामध्ये संजीवराजे नाईक- निंबाळकर, मानसिंगराव जगदाळे आणि वसंतराव मानकुमरे यांचा समावेश आहे. आमदार नरेंद्र पाटील यांचे बंधू रमेश पाटील (मंद्रुळ कोळे) यांचे नावही शर्यतीत आहे; पण ते पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मानकुमरे यांना लाल दिव्याचे स्वप्न दाखविले आहे. त्यातच त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना अंगावर घेऊन या जबाबदारीसाठी आपण कसे पात्र आहोत हे दाखविले आहे; पण निकालादिवशी मानकुमरेंना पोलिस कोठडीत राहावे लागले. सातारा- जावळीचे आगामी राजकारण व उदयनराजेंना थोपण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून शिवेंद्रसिंहराजेंकडून मानकुमरेंच्या नावाचा आग्रह धरला जाऊ शकतो. सर्वाधिक सदस्य निवडून आणल्याची फुटपट्टी त्यासाठी वापरल्यास लाल दिव्याचे सर्वात प्रबळ दावेदार सध्या तरी संजीवराजे नाईक- निंबाळकर हेच आहेत. त्यांनी सलग चौथ्यांदा मोठ्या मताधिक्‍याने जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे.

सभागृहातील सर्वात अनुभवी सदस्य ते असणार आहेत. फलटण तालुक्‍यावर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व राखण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची ताकद त्यांच्या मागे आहे. आजवर केवळ अध्यक्षपदाच्या आरक्षणामुळेच ते लाल दिव्यापासून अलिप्त राहिले होते. त्यामुळे त्यांना ही पहिलीच संधी मिळण्याची शक्‍यता जास्त आहे.

Web Title: satara zp chairman slection