‘झेडपी’त हुकमी एक्का कोण?

‘झेडपी’त हुकमी एक्का कोण?

आज मतमोजणीनंतरच होणार स्पष्ट; नेत्यांची मने मात्र सत्तास्थानावर पोचली 
सातारा - मतदानानंतर जिल्हा परिषदेच्या सत्तेवर सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून दावा सांगितला जात आहे. जिल्हाध्यक्षांसह नेत्यांनी आकड्यांचा खेळ मांडला आहे. राजकारणाच्या सारिपाटावरील या खेळात कोण हुकमी एक्का ठरणार, हे उद्या (गुरुवारी) मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार असले तरी नेत्यांची मने मात्र सत्तास्थानावर जाऊन बसली आहेत.

जिल्हा परिषदेच्या ६४ आणि पंचायत समितीच्या १२८ जागांसाठी निवडणूक झाली. आता निकालाची उत्सुकता आहे. कोणाची मते कुठे वळली, कोणी नाराज होऊन तेच तेच राहू देत नव्यांना संधी देऊ यात या भावनेतून मतदान प्रक्रिया झाली. जिल्ह्यात गेल्या पंचवार्षिकपेक्षा चार टक्‍क्‍याने मतांचा टक्का वाढला आहे. गेल्या पंचवार्षिकला ६८ टक्के मतदान झाले होते. यावेळेस ते ७२ टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. हा वाढलेला टक्का कोणाच्या पदरात पडणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने ६१ गट आणि १२० गणांत उमेदवार उभे केले होते. तीन ठिकाणी काँग्रेसशी आघाडी केली होती. भाजपने ५८ गट आणि ११० गण लढले असून तीन जागा ‘रासप’ला दिल्या होत्या. शिवसेनेने ५४ गट आणि ११० गण लढले आहेत. तर चार जागा त्यांनी पुरस्कृत केल्या आहेत. काँग्रेस ४२ गट, ८४ गण लढत आहे. तीन जागांवर त्यांनी आघाडी केली आहे. हे सर्व उमेदवार व झालेल्या मतदानाच्या अंदाजातून प्रत्येक पक्षांच्या नेत्यांसह जिल्हाध्यक्षांनी वेगळाच अंदाज काढला आहे.

राष्ट्रवादीला बहुमत सहज शक्‍य
सुनील माने (राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष) : जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याकडेच ठेवण्यात यशस्वी होईल. ६४ पैकी साधारण ३८ ते ३९ जागा आमच्या पक्षाला मिळतील. त्यामुळे बहुमताचा आकडा आम्ही सहज पार पाडून आमची सत्ता आम्ही अबाधित राखू.
 

भाजप दुसऱ्या क्रमांकावर
विक्रम पावसकर (भाजप जिल्हाध्यक्ष) : भारतीय जनता पक्षाने पालिका निवडणुकीतील यशाच्या आधारे यावेळेस प्रथमच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ताकतीने उमेदवार उभे केले आहेत. आम्हाला १५ ते १८ जागांवर यश मिळेल. राष्ट्रवादीनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या सत्तेत विरोधी बाकावर असणार आहोत. हा आमचा सत्तेतील प्रवेश असेल. 

काँग्रेसच्या जागा वाढतील
आनंदराव पाटील (काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष) : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यावेळेस आम्ही तीन जागांवर राष्ट्रवादीशी आघाडी केली आहे. गेल्यावेळच्या तुलनेत आम्हाला सहा ते सात जागा जादा मिळतील. साधारण २८ जागा आम्ही जिंकू असे वाटते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तास्थानात राष्ट्रवादीसोबत काँग्रेसही असेल.

शिवसेना चंचूप्रवेश करेल
हर्षल कदम (शिवसेना जिल्हाप्रमुख) : शिवसेना जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूरच होती. यावेळेस काँग्रेसपेक्षाही अधिक जागांवर आम्हाला उमेदवार मिळाले होते. मतदानाचा वाढलेला टक्का पाहता आम्हाला जिल्हा परिषदेत सात ते आठ जागांवर यश मिळेल. किमान आम्ही चंचूप्रवेशही करू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com