उत्सुकता...धाकधूक...आणि जल्लोष!

सातारा - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी औद्योगिक वसाहतीत गुरुवारी मतमोजणी झाली. निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्ते गुलालाची उधळण करत जल्लोष करत होते.
सातारा - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी औद्योगिक वसाहतीत गुरुवारी मतमोजणी झाली. निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्ते गुलालाची उधळण करत जल्लोष करत होते.

सातारा - उत्सुकता... धाकधूक.... जल्लोष... गुलालाची उधळण... फटाक्‍यांचा कडकडाट, ढोलताशांचा दणदणाट... जयघोष आणि कोठे निराशेची सामसूम...! अशा भावभावनांच्या कल्लोळात आज सकाळी जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली.

फेरीनिहाय निकाल जाहीर होऊ लागताच उमेदवारांसह कार्यकर्त्यांत धाकधूक वाढू लागली. एक- एक निकाल बाहेर पडू लागला आणि गुलालाच्या उधळणीत फटाक्‍यांच्या माळा फुटू लागल्या. विजयी उमेदवारांच्या जजयकाराने आसंमत भरून जाऊ लागला. अनेक ठिकाणी गुलालाचे ढीग जमिनीवर टाकून ओंजळीने गुलाल उधळल्याने रस्ते आणि कार्यकर्ते लालभडक होऊन गेले.

जिल्ह्याच्या अकरा तालुक्‍यांच्या ठिकाणी आज सकाळी दहा वाजता मोठ्या बंदोबस्तात मतमोजणीस सुरवात झाली. सकाळी आठपासूनच उमेदवारांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते मतमोजणीच्या ठिकाणी जमू लगले होते. प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणापासून पोलिसांनी कार्यकर्त्यांना लांबवर रोखले होते.

पहिल्या दुसऱ्या फेऱ्यांचे निकाल पहिल्या तासातच बाहेर पडू लागले. ध्वनिक्षेपकावरून ते जाहीर होताच आघाडीवर असलेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते जल्लोष करत होते, तर विरोधी मागे पडलेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांत शांतता पसरत होती. एक ते दीड तासातच गट आणि गणांचे निकाल बाहेर पडले आणि एका पाठोपाठ जल्लोषांचे बार उडू लागले. गुलालाची उधळण सुरू झाली. 

आज जिल्ह्यात ६४ गट आणि १२८ गणांतील ८२४ उमेदवारांची मतमोजणी जिल्ह्यात सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार असल्यामुळे बहुतेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी निवडणुकांमुळे उमेदवार आणि कार्यकर्ते वाढलेले होते. प्रत्येक तालुक्‍यात मतमोजणीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यांना रोखताना पोलिसांना कसरत करावी लागत होती. कोण आघाडीवर कोण पिछाडीवर याची चर्चा सुरू होती. निकाल कळेल तसे गावात थांबलेल्या कार्यकर्त्यांना मोबाईलवरून निकाल कळविले जात होते. 

विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचा अव्याहत जल्लोष सुरू होता, तर पराभूत उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते काढता पाय घेत होते. दुपारी बारापर्यंत बऱ्यापैकी निकाल जाहीर झाले. जिल्ह्यात अनेक मातब्बरांना पराभवाचा धक्का बसला होता, तर काही नवोदित अनेपेक्षितपणे विजयाची माळ गळ्यात मिरवत होते.  जास्त पक्ष अन्‌ उमेदवारांमुळे मतमोजणमीच्या विभागणीने आज निकालाची मोठी उत्सुकता होती. मातब्बरांना धक्के बसणार, अनपेक्षितपणे नवखे विजयी होणार, अशी भाकिते वर्तविली जात होती. अनेक तालुक्‍यांत नेमके, तसेच चित्र पाहावयास मिळाले आणि झेडपी कोणाकडे जाणार, पंचायत समिती कोणाकडे जाईल याची चर्चा रंगू लागली. 
दरम्यान, निकाल जाहीर होताच कार्यकर्ते आपापल्या उमेदवारासह गावाकडे गुलालाची उधळण करत परतू लागले. त्याच वेळी गावागावांतही गुलालाची उधळण आणि फटाक्‍यांची आतषबाजी सुरू होती.

कार्यकर्त्यांची एक नजर महापालिकांकडेही...
मतमोजणीच्या ठिकाणी कार्यकर्ते फेरीनिहाय निकाल कळताच आपापल्या गावात बातमी कळवीत होते. कारण सर्वत्रच मोठी उत्सुकता होती. आपल्या उमेदवाराचे काय होणार, याची जशी उत्सुकता होती, तशीच महापालिकांच्या निवडणुकांकडेही कार्यकर्त्यांची नजर होती. तेथील निकालांसाठी सोशल मीडियाची मदत घेतली जात होती. पुणे- मुंबईत कोण आघाडीवर, कोणता पक्ष सत्तेवर येणार, याचीही चर्चा बरोबरीने सुरू होती. त्या बातम्याही गावाकडे शेअर केल्या जात होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com