साताऱ्यातील जवान बागडे कारगिलमध्ये हुतात्मा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

सेवा बजावताना आले हौतात्म्य

कारगिल येथील बर्फाच्छादित भागात सप्लायर (चालक) म्हणून सेवा बजावत असताना त्यांचा अचानक मृत्यू झाला. तेथे प्रचंड बर्फवृष्टी सुरू असल्याने बागडे यांचे पार्थिव शनिवारी (ता. 8) सकाळी अकरापर्यंत धोंडेवाडी येथे पोचण्याची शक्‍यता आहे.

मायणी : सातारा जिल्ह्यातील धोंडेवाडी (तालुका : खटाव) येथील जवान भागवत मुरलीधर बागडे (वय 35) यांचा कारगिल येथे अचानक मृत्यू झाला. मृत्यूचे काऱण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती दूरध्वनीद्वारे कर्नल पांडे यांनी बागडे कुटुंबीयांना दिली. बागडे यांच्या मागे आई सिंधूताई, पत्नी अजिता व तन्मय (वय 3 वर्षे) आणि हर्षद (वय 1 वर्ष) ही दोन मुले आहेत.

भागवत बागडे हे चौदा वर्षांपूर्वी लष्करात भरती झाले होते. जवानांसाठी आवश्‍यक असणाऱ्या साधनसामग्रीचा पुरवठा करण्याचे काम ते करीत होते. कारगिल येथील बर्फाच्छादित भागात सप्लायर (चालक) म्हणून सेवा बजावत असताना त्यांचा अचानक मृत्यू झाला. तेथे प्रचंड बर्फवृष्टी सुरू असल्याने बागडे यांचे पार्थिव शनिवारी (ता. 8) सकाळी अकरापर्यंत धोंडेवाडी येथे पोचण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केल्याची माहिती सरपंच हणमंत भोसले यांनी दिली. बागडे कुटुंबीयांवर भागवत यांच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कर्ता पुरुष जाण्यामुळे कुटुंब निराधार झाले आहे.

दरम्यान, आज सकाळीच त्यांचे पत्नी अजिता यांच्याशी सुमारे अर्धा तास फोनवरून बोलणे झाले होते. सर्व समाजामध्ये मिळून मिसळून असणारे भागवत वर्षातून किमान दोन वेळा गावाकडे येत असत. सामाजिक कार्याची आवड असल्याने तरुण मंडळांच्या मार्फत विविध समाजोपयोगी कामांत ते हिरीरिने सहभागी होत असत. तीन-चार वर्षांपूर्वी पाणीटंचाईच्या काळात भागवत यांनी पुढाकार घेत स्वतःच्या विंधनविहिरीचे पाणी लोकांना दिले होते. सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या भागवत यांच्या मृत्यूची बातमी कळताच ग्रामस्थांना धक्का बसला आहे.