शाहूराजा, तुजला हा मुजरा!

कोल्हापूर - लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
कोल्हापूर - लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.

कोल्हापूर - 'राजर्षी छत्रपती शाहू राजाची दादा राजाची गा राजाची...’ असे अभिमानगीत गात आज दसरा चौकातून समता फेरी निघाली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या या भव्य फेरीतून शाहूकार्य उलगडले. दरम्यान, दसरा चौकातून या फेरीला प्रारंभ झाला. भर पावसातही सळसळत्या उत्साहात शाहूप्रेमींसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी फेरीत सहभागी झाले. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर फेरीला प्रारंभ झाला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महापौर शोभा बोंद्रे, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, उपमहापौर महेश सावंत, डी. बी. पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आदी या वेळी प्रमुख उपस्थित होते. 

सामाजिक न्याय विभागातर्फे समता रॅलीचे आयोजन झाले. राजर्षी शाहूंची वेशभूषा केलेले विद्यार्थी, शाहूकार्यावर आधारित चित्ररथ, हलगी व लेझीम पथकासह ‘राजर्षी शाहू महाराज की जय’ अशा जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला. पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते या वेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप झाले. दरम्यान, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, प्रांताधिकारी सचिन इथापे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, समाज कल्याण निरीक्षक संजय पोवार आदी या वेळी उपस्थित होते.

सळसळता उत्साह
सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने फेरीत सहभागी शाहूप्रेमी व विद्यार्थी रेनकोट आणि छत्र्या घेऊनच आले. दसरा चौक छत्रीमय झाला. मात्र भर पावसातही सळसळता उत्साह कायम होता. मुलींच्या लेझीम पथकाने फेरीची उंची आणखीनच वाढवली. व्हिनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, आईसाहेब महाराज पुतळ्यामार्गे फेरी पुढे मार्गस्थ झाली. 

लक्षवेधी फलक
‘शाहूंची नगरी-वसतिगृहांची जननी’, ‘दीनदलितांचा कैवारी-राजर्षी शाहू’ अशा लक्षवेधी फलकांसह शाहूंचे पर्यावरण संवर्धनाचे काम, शिक्षणाचे सार्वत्रिकरण, प्राथमिक शिक्षणाचा कायदा आदी विषयांवरील चित्ररथ फेरीत होते.

फेसबुक लाईव्ह व्हिडीओ पुन्हा पहा
कोल्हापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाची डागडुजी करून त्यांचे जिवंत स्मारक उभे करण्यात आले आहे. या स्मारकाची एक सफर ‘फेसबुक लाईव्ह’ करण्यात आली. याचे सूत्रसंचालन ‘सकाळ’चे मुख्य बातमीदार सुधाकर काशीद यांनी केले; तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी इतिहासाची काही पाने उघडली. याचा व्हिडिओ पहा www.facebook.com/kolhapursakal  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com