शरद पवार रमले "पुस्तकांच्या गावात'! 

शरद पवार रमले "पुस्तकांच्या गावात'! 

भिलार - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज भिलार या "पुस्तकांच्या गावाला' भेट दिली. काही काळ तेथील पुस्तकांत ते रमले. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पुतणी सौ. विजया पाटील, डॉ. रजनी इंदूलकर, स्नुषा सुनेत्रा पवार, सौ. निकोला पवार, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, आमदार मकरंद पाटील आदी उपस्थित होते. 

श्री. पवार खासगी दौऱ्यानिमित्त महाबळेश्‍वर मुक्कामी आहेत. वेळात वेळ काढून आज त्यांनी पुस्तकांचे गाव भिलार येथे भेट दिली. या भेटीत त्यांनी सरपंच सौ. वंदना भिलारे व माजी आमदार, स्वातंत्र्यसैनीक भि. दा. भिलारे (गुरुजी) यांच्या पुस्तकांच्या घरांना भेट दिली. साहित्याचा प्रकार, पुस्तकांची संख्या याचबरोबर पुस्तके कशा पद्धतीने निवडली, याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. मोठ्या कुतूहलाने पुस्तके हाताळली. प्रवीण भिलारे यांच्या घरातील पुस्तकांमधील एक भाकरी चुलीवरची व प्रशांत भिलारे यांच्या घरात असलेल्या ऐतिहासिक पुस्तकांची पाहणी केली. रॅकमध्ये असलेली छावा, राजा शिवछत्रपती ही पुस्तके उत्सुकतेने पाहिली. मोठ्या अभिमानाने त्याबाबतची माहिती आपल्या कुटुंबीयांना देताना कुटुंबवत्सल पवार साहेबांचे आगळेवेगळे दर्शन घडले. यानंतर हिलरेंज हायस्कूलमधील पुस्तकांच्या घरास भेट दिली. या वेळी राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे यांनी पुस्तके भेट देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी या संपूर्ण उपक्रमाविषयी त्यांनी सविस्तर माहिती घेतली. 

जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, पंचायत समितीच्या सभापती रूपाली राजपुरे, जिल्हा परिषद सदस्या नीता आखाडे, पंचायत समिती सदस्य संजूबाबा गायकवाड, बाबूराव संकपाळ, भिलारच्या सरपंच वंदना भिलारे, महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, नगरसेवक कुमार शिंदे, माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे, प्रवीण भिलारे, गणपतशेठ पार्टे, राजेंद्र भिलारे, मनीष भंडारे, तेजस्विनी भिलारे, नितीन भिलारे, जतीन भिलारे आदी उपस्थित होते. 

आमदारांच्या गुगलीला पवारांचा षटकार 

हिलरेंज हायस्कूलच्या प्रांगणात पुस्तकांच्या भेटीचा हा साहित्यिक फड हळूहळू राजकीय पटलाकडे वळला. श्री. पवार यांनी उपस्थितांना आपल्या नातलगांची ओळख करून दिली. आमदार पाटील व बाळासाहेब भिलारे यांची ओळख नातेवाइकांना करून दिली. "आमदार मकरंद आबांना आम्ही पुन्हा एकदा आमदार करणार आहोत,' असे बाळासाहेब भिलारे यांनी म्हटले. त्यावर "पुन्हा एकदाच होणार? मला वाटले, तुम्ही मला तहहयात आमदार कराल,' अशी गुगली टाकली. या दोघांची आमदारकीची अशी फिक्‍सिंग सुरू असतानाच श्री. पवार यांनी "मी तिकीट दिले तर तुम्ही आमदार होणार ना?' असा षटकार ठोकताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. 

यशवंतरावांचे स्मरण देणारा उपक्रम 
श्री. पवार यांनी पुस्तकांच्या गावाच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. तेथील वहीत आपला अभिप्रायही नोंदविला. "प्रत्येकाच्या विकासात ज्ञानसंपादनाची आवश्‍यकता आहे. त्यासाठी वाचनसंस्कृतीस प्रोत्साहन दिले पाहिजे. पुस्तकांचे गाव हा अभिनव उपक्रम इतर गावांना प्रेरणा देणारा आहे. (कै.) यशवंतराव चव्हाण यांनी आयुष्यभर ग्रंथसंपदा जपली. त्यांचे स्मरण देणारा हा उपक्रम आहे,'' असे त्यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे. 

जुन्या आठवणींना उजाळा 
भिलारे गुरुजींच्या पुस्तकांच्या घराच्या भेटीप्रसंगी गुरुजींचे नातू प्रशांत भिलारे यांनी भिंतीवरील पवार साहेबांच्या एका फोटोकडे श्री. पवार यांचे लक्ष वेधले. फोटोकडे पाहताच त्यांनी बाळासाहेब भारदे आणि भि. दा. भिलारे गुरुजींच्या फोटोमधून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. गुरुजींच्या तब्येतीचीही त्यांनी आस्थेने चौकशी केली. प्रवीण भिलारे यांच्या घरातील भेटीप्रसंगी सौ. सुनेत्रा पवार यांच्या राजकीय नजरेने घरातील एका फोटोचा वेध घेतला. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे त्या फोटोत आहेत. ही बाब सौ. पवार यांच्या चाणाक्ष नजरेने टिपली. त्यावर प्रवीण भिलारे म्हणाले, ""आम्ही काही काळ मुंबईस्थित होतो. शिंदे आमच्या भागातील असल्याने त्यांच्याविषयी विशेष आदर आहे. मात्र, आम्ही पवार साहेबांचे निष्ठावंत पाईक आहोत.'' श्री. भिलारे यांच्या या खुलाशावरही सर्व जण हास्यात बुडून गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com