लढायला शिवसैनिक, मलिद्याला उपरे

लढायला शिवसैनिक, मलिद्याला उपरे

कोल्हापूर - ‘लढायला निष्ठावंत शिवसैनिक आणि मलिद्याला उपरे’ ही परंपरा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही शिवसेनेत कायम राहिल्याचे चित्र पुढे आले आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून सोईच्या राजकारणात नेते आयाराम असलेल्या तिसऱ्यालाच जवळ करतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या शिवसैनिकाला डावलून उपऱ्यांना संधी देणाऱ्या नेत्यांच्या विरोधातच आता निष्ठावंत शिवसैनिक मोट बांधण्याच्या तयारीला लागला आहे.

शिवसेनेची पाळेमुळे जिल्ह्यात खोलवर रुजली आहेत. केवळ एका हाकेवर शेकडो कार्यकर्ते भगव्या झेंड्याखाली येतात. कार्यकर्त्यांची फळी शिवसेनेकडे आहे; पण या कार्यकर्त्यांना नेता होण्याचे भाग्य शिवसेनेत तरी मिळत नाही, हेच आजपर्यंत दिसून आले आहे. निवडणुका जवळ आल्या की नेत्यांना शिवसैनिक आठवतो. या वेळी निष्ठावंतांना डावलले जाणार नाही, असा फुसका बार फोडला जातो. खंडेनवमीला जशी जुनी शस्त्रे आठवतात तसे ऐन लढाईच्या वेळी नेत्यांना निष्ठावंत शिवसैनिक आठवतात. 

उमेदवारी देताना किंवा निकालानंतर शिवसैनिक पुन्हा अडगळीत जातो. शिवसेनेची ही चालच आतापर्यंत अनुभवायला आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठी आहे. 

निवडणुकीत उमेदवारी देताना निष्ठावंत हा निकष कधी बाजूला पडला, हे लक्षात येत नाही. निवडून येण्याची क्षमता हा निकष पुढे येतो आणि सच्चा शिवसैनिकाच्या हातात केवळ भगवा झेंडा राहतो. वर्षानुवर्षे झेंडा हातात घेण्यापलीकडे त्यांच्या पदरात काहीच पडत नाही. ‘बळी तो कान पिळी’ या तत्त्वाने नेते आपले स्थान बळकट कसे होईल यालाच महत्त्व देतात. अन्याय झाला तर विचारायची सोय नाही, तत्काळ गद्दार ठरवण्याची भाषा होते. इतकी वर्षे शिवसेनेसाठी केलेले काम पाण्यात जाते. 

नेते केवळ स्वार्थाचा विचार करतात. आपले स्थान, संस्था बळकट करताना उपद्रवमूल्य असणाऱ्यांना उमेदवारी देऊन गप्प केले जाते. शिवसैनिकांमुळे शिवसेनेची पाळेमुळे रुजली; पण नेत्यांमुळे उपऱ्यांची पाळेमुळे शिवसेनेत आजपर्यंत रुजली. उपरा उमेदवार द्यायचा आणि तुमचा उमेदवार ‘धनुष्यबाण’, बाकीचा विचार नाही. भगवा फडकलाच पाहिजे, अशी भावनेला हात घालणारी भाषा करून शिवसैनिकाला गप्प बसवले जाते. कुठे बोलायची सोय नाही. आज ना उद्या कधी तरी सच्चा शिवसैनिकांना न्याय मिळेल, या आशेवर आजपर्यंत कार्यकर्ते शांत आहेत. पण कधी ना कधी उद्रेक होणार हे निश्‍चित आहे. 

निवडणुका पैशावर जिंकता येतात आणि आमचा शिवसैनिक पैशाकडून मागे पडतो, असे सांगून उपऱ्याच्या उमेदवारीची भलावण केली जाते. शिवसेनेचे नेते काही गरीब नाहीत. एखाद्या सच्चा, निष्ठावंत शिवसैनिकासाठी चार पैसे खर्च करून त्याला पुढे आणण्याऐवजी त्याचा शस्त्र म्हणून उपयोग करून घेणे अधिक सोपे असल्याचे नेत्यांना चांगलेच ठाऊक झाले आहे. त्यामुळे स्वार्थासाठी सर्वसामान्य शिवसैनिकांना वंचित ठेवण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. 

उपऱ्याला उमेदवारी देताना त्याचे उपद्रवमूल्य किती, भविष्यात तो आपल्याला किती अडचणी आणू शकतो, त्याची आर्थिक स्थिती किती भक्कम आहे, समाजात दहशत आहे का, हेच पाहिले जाते. सच्चा शिवसैनिक अजूनही गप्प आहे. स्वतःच्या राजकारणासाठी त्याचा उपयोग करून घेतला जातो हे आता त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या वेळीही निवडणुकीत बंडखोरी करून नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी एकजूट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

कार्यकर्त्यांचे दुखणे
 उमेदवारीसाठी निष्ठावंत निकष बाजूला; निवडून येण्याच्या क्षमतेला महत्त्व
 सोईच्या राजकारणात नेत्याकडून तिसराच जवळ
 सच्चा कार्यकर्त्याचा शस्त्र म्हणून उपयोग
 नेत्यांमुळे उपऱ्यांची पाळेमुळे शिवसेनेत रुजली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com