शिवाजी स्टेडियमवरील खेळपट्टी गेली कोठे? 

शिवाजी स्टेडियमवरील खेळपट्टी गेली कोठे? 

कोल्हापूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी नावाजलेली छत्रपती शिवाजी स्टेडियमवरील खेळपट्टी शोधून दाखवा म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाने केलेल्या दुर्लक्षामुळे खेळपट्टी नष्ट झाल्याने सरकारी कामातील डोळेझाकपणा काय असतो, याचा अनुभव येत आहे. ज्या उद्देशाने स्टेडियम बांधले गेले तो उद्देश सपशेल फोल ठरला असून, स्टेडियमच्या मैदानावरील हिरवळही टिकविता आलेली नाही. 

स्टेडियमची देखभाल योग्यरीत्या करण्याची सक्षमता क्रीडा कार्यालयाला दाखविता आलेली नाही. एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या प्रवृत्तीमुळे स्टेडियमचे नुकसान होत आहे. मैदानावर प्रवेश करण्यास खेळाडूंना ओळखपत्रे सक्तीची करण्यात आली होती. स्टेडियमच्या परिसरातील खेळाडूंनी खेळायला कोठे जायचे, या विचारातून ओळखपत्राला विरोध झाला. खेळपट्टीवर खेळू नका, असे म्हणणाऱ्या कार्यालयातील शिपायांना खेळाडूंच्या दादागिरीचा अनुभवही आला. काही वेळा तर शिपायांना मारही खावा लागला. मैदान नक्की क्रिकेटसाठी, की फुटबॉलसाठी असा प्रश्‍नही निर्माण झाला. मात्र, क्रीडा कार्यालयाची बोटचेपी भूमिका वारंवार खेळाडूंच्या हुल्लडबाजीला पूरक ठरली. 

ज्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट, रणजी क्रिकेट, हॉकीचा सामना झाला, त्या मैदानाची रयाच गेली आहे. मैदानावरील हिरवळ पाण्याअभावी नष्ट झाली आहे. मैदानावरील कूपनलिकेला पाणी नाही, अशी सरकारी उत्तरे देऊन क्रीडा कार्यालय आपली जबाबदारी झटकत आहे. काही वर्षांपूर्वी गुरव यांच्या विहिरीतून पाणी मैदानावर आणून रणरणत्या उन्हात मैदान हिरवेगार ठेवण्यात आले होते. क्रीडा कार्यालयाचा हा आनोखा प्रयत्न कौतुकास्पदही होता. विभागीय क्रीडा संकुलाच्या "अर्थ'पूर्ण कामानंतर स्टेडियमकडे कोणालाच लक्ष देण्यास वेळ नाही, अशीच स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी स्तुती केलेल्या खेळपट्टीवर हिरवळीचा लवलेशही उरलेला नाही. मैदानावर उडणारी धूळ पाहण्याची वेळ क्रीडाप्रेमींवर आली आहे. 

आजवर झालेले सामने असे : 
- सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र रणजी (1971) 
- चंदू बोर्डे गौरव क्रिकेट सामना (1978) 
- बडोदा विरुद्ध महाराष्ट्र रणजी (1989) 
- मुंबई विरुद्ध महाराष्ट्र पश्‍चिम विभागीय क्रिकेट (1982) 
- इंग्लंड विरुद्ध कोल्हापूर जिल्हा युवक संघ क्रिकेट (1988) 
- कौंटी सेवक संघ विरुद्ध कोल्हापूर युवक सेवक संघ (1990) 
- विल्स क्रिकेट विरुद्ध महाराष्ट्र (1990) 
- बडोदा विरुद्ध महाराष्ट्र रणजी (1991) 
- रमाकांत आचरेकर गौरव क्रिकेट (1992) 
- भाऊसाहेब निंबाळकर क्रिकेट (1994) 
- पंजाब विरुद्ध महाराष्ट्र रणजी (2005) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com