सेना-भाजप युतीत संभ्रम

- विकास कांबळे
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

कोल्हापूर - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची राज्यात युती झाली तरी जिल्ह्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांची युती होण्याची शक्‍यता कमीच आहे. स्वतंत्रपणे लढून निवडणुकीनंतर युती करण्याचा विचार या दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे. 

कोल्हापूर - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची राज्यात युती झाली तरी जिल्ह्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांची युती होण्याची शक्‍यता कमीच आहे. स्वतंत्रपणे लढून निवडणुकीनंतर युती करण्याचा विचार या दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे. 

काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा कोल्हापूर जिल्हा विधानसभा निवडणुकीत ढासळला. नावालादेखील काँग्रेसचा आमदार विधानसभा निवडणुकीत निवडून आला नाही मात्र शिवसेनेने बाजी मारली. सेनेचे सहा आमदार निवडून आले. भाजपचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन आमदार निवडून आले आहेत. युती करत असताना ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार असेल, त्याला साहजिकच शिवसेनेला जादा जागा सोडाव्या लागतील आणि भाजपच्या नेत्यांना हे मान्य असणार नाही. त्यामुळे कार्यकर्तेदेखील थोडे हवेत आहेत; पण विधानसभा आणि त्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद मतदारसंघांची संख्या पाहिल्यानंतर जागावाटपात अडचणी येणार असल्याने ज्या ठिकाणी शक्‍य नाही, त्याठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय ठेवावा, असे मत कार्यकर्त्यांचे आहे.

विधानसभा निवडणुकीत मूळ पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे अनेकजण शिवसेनेत तर काही जण भारतीय जनता पक्षात गेले आणि निवडूनही आले. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकारण करताना या मंडळींना राज्यात काय निर्णय होतो, यापेक्षा स्थानिक राजकारण महत्त्वाचे आहे.

राधानगरी भुदरगडमधून निवडून आलेले प्रकाश आबिटकर मूळचे राष्ट्रवादीचे, शिरोळचे उल्हास पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, चंद्रदीप नरके काँग्रेसचे, सत्यजित पाटीलही तसे काँग्रसचेच; पण ते यापूर्वी शिवसेनेकडून एकदा आमदार झाले आहेत. अमल महाडिक मूळचे काँग्रेसचे. त्यामुळे त्यांना सर्वच लोकांनी मदत केली असल्यामुळे सध्या त्यांना सावधच भूमिका घ्यावी लागणार आहे.

त्याला पर्याय म्हणून राधानगरी, भुदरगड विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीपुरती आमदार प्रकाश आबिटकर, दिनकर जाधव, बजरंग देसाई यांनी राष्ट्रवादी वगळून आघाडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते. शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात आमदार सत्यजित पाटील यांनी गेल्यावेळची जिल्हा परिषदेच्या निवडणूक आघाडी करून लढविली होती. या वेळीही ते स्थानिक आघाडी करणार आहेत.

करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी गेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर चांगले उमेदवार निवडून आले आहेत. त्यांच्या मतदारसंघात भाजपला शिवसेना किती जागा सोडणार? हा प्रश्‍नच आहे. असा प्रकार सहा विधानसभा मतदारसंघांत पाहावयास मिळत आहे.

हातकणंगले विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर आमदार आहेत. मात्र या तालुक्‍यावर प्रभाव आहे काँग्रेस, जनसुराज्य शक्‍ती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा. शिरोळमध्ये उल्हास पाटील जरी शिवसेनेचे आमदार असले तरी या तालुक्‍यात स्वाभिमानीचा प्रभाव आहे. या ठिकाणी शिवसेना किती जागा मागणार आणि किती मिळणार,हे कोडेच आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अमल महाडिक आमदार आहेत. या ठिकाणी शिवसेनेला जादा जागांचा आग्रह धरता येणार नाही.  

संख्याबळ ठरणार महत्त्वाचे
आघाडी किंवा युती करत असताना विद्यमान सदस्यांना प्राधान्य दिले जाते. भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर गेल्या झेडपी निवडणुकीत एकच सदस्य निवडून आला आहे. याउलट शिवसेनेचे सहा उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे युती करताना भारतीय जनता पक्षाला जागा मागताना देखील अडचणी येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबत संभ्रमावस्था आहे.

Web Title: shivsena-bjp alliance confussion